नकार पचवून प्रेम करा

By Admin | Published: February 13, 2015 12:40 AM2015-02-13T00:40:08+5:302015-02-13T00:44:31+5:30

असीम सरोदे : न्यू कॉलेज येथे व्याख्यानाचे आयोजन

Repeat digested love | नकार पचवून प्रेम करा

नकार पचवून प्रेम करा

googlenewsNext

कोल्हापूर : मानवनिर्मित कृत्रिम गोष्टीला आजची तरुणाई चिकटून बसली आहे. या प्रकारामुळे आजच्या पिढीतील संवाद कमी होत चालल्याने प्रेम हे संकुचित होत चालले आहे. युवकांनी होकार स्वीकारून आनंदी होण्यापेक्षा, नकार पचवून प्रेम करावे, असे आवाहन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले. न्यू कॉलेजमधील सभागृहात महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती व सहयोग ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रेम हक्क आणि जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सचिन गुफे होते. सरोदे म्हणाले, आजच्या २१ व्या शतकातही मागासलेपणा वाढला आहे. अजूनही आपल्याकडे आंतरजातीय विवाह नाकारला जातो. शिक्कामोर्तब होऊन कुणाचा जन्म होत नाही. जन्मत: सर्वजण एकच आहेत. ही गोष्ट कोणी स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. प्रेम ही सहज भावना आहे, तर धर्म ही पोकळ भावना आहे. प्रेमात विचार असावा, अविचार नसावा. वैचारिक प्रेम करून प्रेमाचा जीर्णोद्धार करावा, असेही त्यांनी सांगितले.
सरोदे पुढे म्हणाले, आदर्शवादी तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अनिष्ट गोष्टींकडे आजची तरुणाई झुकत आहे. आपल्याकडील लग्नव्यवस्था तपासली पाहिजे. लग्नातील अनेक पारंपरिक प्रथा थांबविल्या पाहिजेत. लग्न म्हणजे जीवन जगण्याची व जीवन सिद्ध करण्याची गोष्ट आहे. खऱ्या कर्तृत्वाची सुरुवात लग्नानंतरच होते, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रेमविवाह व आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसह सांस्कृतिक विभागातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्राचार्य नलवडे म्हणाले, प्रेमाची सुरुवात निखळ मैत्रीतून व्हावी. जसे प्रेम करणे हक्क आहे, तसेच कर्तृत्वसुद्धा स्वीकारले पाहिजे.
प्रा. टी. के. सरगर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पवार यांनी आभार मानले. मीनल पाटील व अर्पिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी युवराज कदम, प्रभाकर पाटील, वनिता पोवार, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Repeat digested love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.