कोल्हापुरात'मेक इन इंडिया'ची प्रतिकृती - दुचाकीचे वापरले ३०० स्पेअरपार्ट ; उदय पाटील व नझीम महात यांनी केली मेहनत- -- हट के न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:38 AM2019-02-17T00:38:15+5:302019-02-17T18:41:36+5:30
कोल्हापूरच्या दुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या
- शेखर धोंगडे।
कोल्हापूर : कोल्हापूरच्यादुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या मेकॅनिकनी मेक इन इंडियाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.
नझीम महात व उदय पाटील यांनी सलग दोन महिने अविरत परिश्रम घेऊन स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष करून दुचाकीच्या गाड्यांचे जुन्या स्क्रॅपमधील जवळजवळ तीनशे वस्तू एकत्र करून वेल्डिंगच्या साहाय्याने, उपलब्ध साधनातून पावडर कोटिंग करून घेतले. सिंहाचे मूर्तरूप म्हणजेच मेक इन इंडियाची असलेली प्रतिमा ही विचारात घेऊन तिला मूर्त स्वरूप देण्याचे काम या दोघांनी केले.
याचे एक वेगळेपण म्हणजे जशीच्या तशी ती सिंहरूपी प्रतिमा त्यांनी डोळ्यासमोर उभी केली आहे. त्याच्या आयाळापासून पायाच्या नखांपर्यंत तो जिवंत वाटावा याच्यासाठी मध्यभागी फिरते चक्र इलेक्ट्रीक मोटरद्वारे बसवून त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. त्याला सोनेरी रंगकाम केल्याने ती प्रतिकृती अधिक आकर्षक वाटते. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे भरविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात या प्रतिकृतीने लक्ष वेधून घेतले. सध्या ही प्रतिकृती कोल्हापूर शहरातील वाय. पी. पोवार नगर येथे रेहान अॅटोमध्ये पाहण्यासाठी ठेवली आहे. अॅटोक्षेत्रात खूप काही करण्यासारखे असते, केवळ मेहनत व आपली बुद्धिमत्ता वापरल्यास नक्कीच त्यात यश मिळू शकते असे महात व पाटील यांनी सांगितले.
सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा कौशल्य वापरून मेक इन इंडियामध्ये आपण नेहमीच सहभागी राहिले पाहिजे, याच प्रेरणेने ही प्रतिकृती तयार केली आहेय
- नझीम महात, मेकॅनिक.
कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याने ही प्रतिकृती तयार केली आहे. ती जिवंत वाटावी म्हणून त्यामध्ये खूप बदल केले आहेत.
- उदय पाटील, मेकॅनिक.