कोल्हापुरातील ‘कोरोना’च्या ४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह; बसमधून उतरवून केली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:34 PM2020-03-14T14:34:09+5:302020-03-14T14:35:07+5:30
कोल्हापूर : येथून पुण्याला पाठविण्यात आलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यामध्ये येथील ...
कोल्हापूर : येथून पुण्याला पाठविण्यात आलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यामध्ये येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांचाही समावेश आहे.
आतापर्यंत कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये ५६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यातील बहुतांशी नागरिक दुबईहून आले होते. गुरुवारी दुपारपर्यंत तिघांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तर गुरुवारी संध्याकाळी या रुग्णालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांचाच घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
मात्र, या चौघांच्याही स्रावाचा अहवाल नकारात्मक आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. सीपीआर प्रशासनाने इचलकरंजी आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथेही अशा संशयितांसाठी विशेष व्यवस्था केली असून, शहरातील खासगी इस्पितळांमध्येही सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
बसमधून उतरवून केली तपासणी
कोल्हापूरहून गारगोटीकडे जाणाºया एका प्रवाशाला एसटी बस मध्येच थांबवून तपासणीसाठी आणल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात घडला. कोल्हापूर-गारगोटी बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी दुबईहून आला होता. त्याने मास्क घातला होता. ते पाहून प्रवाशांनी चौकशी केली. तो दुबईहून आल्याचे समजताच ही माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर मध्येच गाडी थांबवून या प्रवाशाला रुग्णालयात आणून त्याची तपासणी करण्यात आली. आपली याआधी मुंबई विमानतळावर तपासणी झाली असल्याचे त्याने सांगितल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
.....................................
समीर देशपांडे