काळे धंदे कळवा.. बक्षीस मिळवा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 10:04 PM2017-07-28T22:04:13+5:302017-07-28T22:05:58+5:30
नेसरी : हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु तो आनंदी व समाधानपूर्वक पार पाडण्यासाठी पोलिसांना जनतेची साथ हवी.
नेसरी : हिंदू धर्मामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु तो आनंदी व समाधानपूर्वक पार पाडण्यासाठी पोलिसांना जनतेची साथ हवी. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याबरोबरच नेसरीसह पोलीस ठाण्याच्या २६ गावांतील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम सहायक पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी सुरू केली आहे.
कोणत्याही नागरिकांनी गावामध्ये काळे धंदे सुरू असल्याचे कळविल्यास पोलीस ठाण्यामध्ये नाव गुप्त ठेवून त्यांना बक्षीस दिले जाईल, अशी माहिती देत नदाफ यांनी ‘काळे धंदे कळवा...बक्षीस मिळवा’ असे आवाहन पोलिस ठाण्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी बोलाविलेल्या विविध गणेश मंडळे व पोलीसपाटील यांच्या संयुक्त बैठकीत केले.
नदाफ म्हणाल्या, गणेश मंडळानी डॉल्बी बॉक्सवर खर्च करण्यापेक्षा चांगले कार्यक्रम राबवावेत. रात्री १० पर्यंतच स्पीकर चालू ठेवा. विनाकारण डॉल्बी लावल्यास त्या मंडळांच्या सर्व सदस्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही नदाफ यांनी दिला. यावेळी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली.
बैठकीस सुरेश तुपूरवाडकर, शिवाजी पाटील, उत्तम नाईक, गंगाराम डोंगरे, प्रमोद नांदवडेकर, अभय जाधव, अभिजित पाटील, संगाप्पा साखरे, कृष्णा पाटील, संजय वार्इंगडे, सचिन कदम, जोतिबा कोलेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना
रिजवाना नदाफ या नेसरी पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी स.पो.नि. म्हणून रुजू झाल्या. येथील कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नेसरीसह भागातील विविध गावांमध्ये अवैध धंदे बंद करण्यासाठी परिस्थितीचा अंदाज घेत प्रत्येक गावच्या पोलीसपाटलांना आवाहन केले होते. तसेच त्यांना सज्जड इशाराही दिला होता. आता थेट नागरिकांनाच काळे धंदे कळविण्याचे आवाहन केल्याने परिसरातील काळे धंदेवाल्यांची भंबेरी उडाली आहे. काळ्या धंद्यांवर टाच आणणाºया अधिकारी नदाफ यांच्या भूमिकेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.