जिल्ह्यातील १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:38+5:302021-05-29T04:19:38+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील १५ जणांचे कोरोना अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हही आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यातील ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील १५ जणांचे कोरोना अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हही आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यातील १४ जण भुदरगड तालुक्यातील असून एक नागरिक कोल्हापूरमधील आहे. यांना एकाच दिवशी ‘पाॅझिटिव्ह’ असल्याचा आणि त्याचवेळी ‘निगेटिव्ह’ असल्याचाही अहवाल मिळाला आहे.
भुदरगड तालुक्यातील अनेक गावच्या १४ नागरिकांनी २५ मे रोजी स्वॅब दिले होते. तसेच कोल्हापूर येथीलही एका नागरिकाने स्वॅब दिला. ते नेहमीप्रमाणे शेंडा पार्क येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. तपासणी होवून गुरूवारी २७ मे रोजी या चाचण्यांचे अहवाल बाहेर पडले. हे अहवाल शासकीय विविध यंत्रणांकडे पाठवण्यात आले असता त्यात एकूण १५ जणांची नावे दोनदा असून त्यातील एका नावासमोर पॉझिटिव्ह तर दुसऱ्या नावासमोर निगेटिव्ह असल्याचा शेरा पडला आहे. कोल्हापुरातील एका २५ वर्षांच्या तरुणाचा अहवाल तरी सकाळी ११ वाजता पॉझिटिव्ह व सायंकाली साडेपाच वाजता निगेटिव्ह आला आहे.
या १६ जणांच्या मोबाईलवरही अशाच पद्धतीने पॉझिटिव्ह असल्याचे आणि निगेटिव्ह असल्याचे मेेसेज पडले आहेत. त्यामुळे यासर्वांना आपण नेमके पॉझिटिव्ह आहोत की निगेटिव्ह हेच कळेनास झाले आहे. अखेर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चौकट
अहवाल खासगी प्रयोगशाळेतील असल्याचा संशय
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आणि शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेच्या मर्यादा असल्याने रोज २ हजार चाचण्या या कोल्हापुरातील खासगी प्रयोगशाळेकडून करून घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडूनच हे अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नीता जांगले यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.
चौकट
याआधीही अहवाल पाठवले होते बाहेर
गेल्या पंधरवड्यात देखील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील यंत्रणेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सात हजाराहून अधिक स्वॅब हे पुणे, रत्नागिरी आणि सांगलीला पाठवण्यात आले होते. आता पुन्हा चाचण्या वाढवण्यासाठी खासगी प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागला आहे.