वैयक्तिक लाभाच्या साहित्याची फेरनिविदा
By admin | Published: January 20, 2016 01:13 AM2016-01-20T01:13:53+5:302016-01-20T01:14:04+5:30
जिल्हा परिषदेच्या सभेत निर्णय : सायकल, शिलाईयंत्र वाजवी किमतीत देण्याची मागणी
कोल्हापूर : शासनाचे दरपत्रक (आरसी) सोयीस्करपणे गुंडाळून ठेवत चार कोटींची खरेदी करण्याच्या विषयावर वादळी चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभासाठी साहित्य खरेदीची फेरनिविदा काढण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
सदस्य सुरेश कांबळे यांनी शासनाच्या निर्णयानुसार निविदा प्रक्रिया पार पडली नाही, असे निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, समाजकल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभ देताना जाणीवपूर्वक अडवणूक होते आहे. गेल्यावेळी घेतलेल्या सायकलचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. बहुतांश सायकली नादुरुस्त झाल्या आहेत. आता नामांकित कंपन्यांचे साहित्य खरेदी करण्याची संधी असतानाही ठरावीकच कंपन्यांना का प्राधान्य दिले जाते? यामध्ये अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे.
धैर्यशील माने म्हणाले, वैयक्तिक लाभासाठीचा निधी सर्वसामान्यांनी भरलेल्या कराचा आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी. तरतूद निधीतून वाजवी किमतीमध्ये दर्जेदार साहित्याची खरेदी करावी, अशी सर्व सभागृहाची मागणी आहे. त्या दृष्टीने सर्व प्रक्रिया राबवावी. शक्य तितक्या लवकर लाभार्र्थ्यापर्यंत साहित्य पोहोच होईल, याची काळजी घ्यावी. मेघाराणी जाधव, स्मिता आवळे, शशिकला रोटे यांनी समाजकल्याण अधिकारी सुदरसिंह वसावे हे ११ महिन्यांपासून पिको फॉल यंत्र खरेदीची प्रक्रिया राबवीत असल्याचे सांगितले. वसावे समितीचे सभापती व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, वसावे यांनी खुलासा केला. खुलाशावर समाधान न झाल्याने या विषयावर दीर्घकाळ चर्चा सुरू राहिली. देशमुख यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग करण्याची तरतूद असल्याचे सांगितले. त्याला विरोध झाला. त्यानंतर देशमुख म्हणाले, साहित्य खरेदी करताना पारदर्शकता राहील याकडे विशेष लक्ष दिले आहे. निविदेतून निवडलेल्या कंपन्यांच्या साहित्याचे दर बाजारमूल्यापेक्षा अधिक आहेत. त्यांना ते कमी करावेत, असे सांगितले; पण या कंपन्या अपेक्षित पैसे कमी करीत नाहीत. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन फेरनिविदा काढूया.
यावेळी अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
देशमुख भावुक ...
४वैयक्तिक लाभाविषयीच्या वादळी चर्चेत अधिकाऱ्यांचा घेरण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मी किती पारदर्शक आणि स्वच्छपणे निविदा प्रक्रिया पार पाडली आहे, हे सांगताना देशमुख भावुक झाले. आक्रमकपणे प्रश्न विचारणारे सदस्यही शांत झाले. तुमच्यावर आमचा आरोप नसल्याचेही सुरेश कांबळे यांनी स्पष्ट केले.
एका कुटुंबात लाभ
४वैयक्तिक लाभाचे साहित्य गरीब, सामान्य, गरजूंपर्यंत पोहोचत नाही. समाजकल्याण विभागातर्फे एकाच कुटुंंबात शिलाई मशीन, सायकल असे अनेक प्रकारचे साहित्य दिले आहे. त्याची चौकशी कधी करणार? असा प्रश्न एकनाथ पाटील यांनी उपस्थित केला.
गोट्या खेळायला आले का ?
४स्मिता आवळे या पिको फॉल मशीन खरेदी निविदेतील दिरंगाईबद्दल अधिकारी वसावे यांना धारेवर धरत होत्या. त्यावेळी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी त्यांना ‘अधिकाऱ्यांचे उत्तर ऐका, तोपर्यंत बसा,’ अशी विनंती केली. यावर आवळे म्हणाल्या, ‘खाली बसण्यातच पाच वर्षे गेली आहेत. बसा म्हणताय, आम्ही काय येथे गोट्या खेळायला आलो आहोत का?’
‘लोकमत’च्या वृत्तावर वादळी चर्चा; बदलला निर्णय
शासनाच्या स्वनिधीतून सायकल, शिलाई मशीन, भांडी संच, मिरची कांडप संच अशा तब्बल ३ कोटी ८९ लाख २३ हजार रुपयांच्या साहित्य खरेदीसाठी निविदा काढून कंपन्या निश्चित केल्या होत्या. मात्र निवडलेल्या कंपन्यांचे साहित्य बाजारपेठेतील नामांकित कंपन्यांच्या साहित्यापेक्षा अधिक महाग होते. मग त्याच कंपन्या निवडण्यामागे अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्या आहेत काय, अशी चर्चा सुरू होती. यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याचे पडसाद सभेत उमटले आणि शासनाचे दरपत्रक सोयीस्करपणे गुंडाळून ठेवत चार कोटींची खरेदी करण्याचा डाव रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.