सरपंच, उपसरपंचासह सदस्यांवर ठपका
By admin | Published: December 28, 2014 12:21 AM2014-12-28T00:21:02+5:302014-12-28T00:24:08+5:30
गगनबावडा ग्रामपंचायत गैरव्यवहार : ‘कारणे दाखवा’ नोटीस, ग्रामसेवकही दोषी, कर्तव्यात कसूर, अतिक्रमणास प्रोत्साहन
कोल्हापूर : गगनबावडा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी आजी आणि माजी सरपंच, उपसरपंचासह सदस्यांवर ठपका ठेवला आहे. तत्कालीन, विद्यमान ग्रामसेवकही दोषी ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १९ डिसेंबरला त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. पुढील कारवाईकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सरपंच अंकिता अरुण चव्हाण, उपसरपंच अरुण हरेंद्र चव्हाण, सदस्य राजेंद्र दशरथ गवळी, सबाना रफिक जमादार, मोहिद्दीन इस्माईल डांगे, चित्रा चंद्रकांत पोतदार, गणेश धनाजी कांबळे, पांडुरंग भागोजी आडुळकर, आनंदा कोयनाप्पा डफडे या विद्यमान पदाधिकाऱ्यांची, तर माजी सरपंच सौ. बतुल इब्राहिम मुकादम, आजी व माजी उपसरपंच अरुण हरेंद्र चव्हाण, माजी सदस्य यशवंत वसंत पेंढारकर, अशोक तुकाराम वरेकर, विलास उमाजी कांबळे, तानाजी मल्हारी पाटील, सुनीता भागोजी डफळे, जरिना हमीद खलीफ, शकिला सलीम जबादार, अशी नोटीस दिलेल्यांची नावे आहेत. यातील अरुण गेल्या पाच वर्षांत आणि आताही उपसरपंच आहेत. गैरव्यवहाराच्या कालावधितील तत्कालीन ग्रामसेवक एम. जी. नेवासे आणि आताचे ग्रामसेवक एन. डी. खोत यांनाही दोषी ठरविले आहे.
सन २००५ साली सरपंच बतुल यांचे पदाधिकारी मंडळ सत्तेवर आले. २०१०पर्यंत त्यांनी गावचा कारभार केला. सन २०१० मध्ये सरपंच अंकिता यांचे पदाधिकारी मंडळ सत्तेत आले. या दोन्ही मंडळांच्या सत्ताकालावधीमध्ये गैरव्यवहार आणि नियमबाह्य कामे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते कारवाईपासून अजूनही अलिप्त आहेत, हे जगजाहीर आहे.
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रीवादीला मतदारांनी सत्तेतून पायउतार केले. भाजप सत्तेवर आली. त्यानंतर कारवाईची फाईल कासवगतीने का असेना, पुढे सरकत आहे. थेट कारवाईचे धाडस अजूनही प्रशासनाला झालेले नाही.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ‘अ’नुसार ग्रामपंचायतीस आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी व्याजासह होणारी १ लाख ६२ हजार १७ रुपये माजी सरपंच बतुल, माजी उपसरपंच अरुण यांच्यासह सात माजी सदस्यांकडून का वसूल करू नये? प्रत्येकांकडून १६ हजार २०२ रुपये वसूल करण्यासंबंधी ३० जून २०१४ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी नोटीस दिली आहे. मात्र, या नोटिसीलाही केराची टोपली दाखविली आहे.
याप्रकरणी ग्रामसेवक यांची फक्त एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई उचित आहे का, असा सवालही नोटिसीद्वारे विचारला आहे. बोगस ग्रामसभा घेतल्याचेही पुढे आले आहे. तीन वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंंबाकडून दोन हजार रुपये घेतले आहेत. त्याची रीतसर पावतीही दिलेली नाही, अशी काही ग्रामस्थांची तक्रार आहे. (प्रतिनिधी) सध्या पत्नी सरपंच अंकिता, तर पती उपसरपंच अरुण अशी एका कुटुंबात महत्त्वाची पदे आहेत, असा या ग्रामपंचायतीमधील कारभार ठळक चर्चेचा विषय झाला आहे. गैरव्यवहार, कर्तव्यात कसूर, अक्षम्य हयगय, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची हानी, अतिक्रमणास प्रोत्साहन दिले, असे महत्त्वाचे आरोप यांच्यावर आहेत. तरीही ते अजून कारवाईविना मोकाट आहेत हे विशेष. थेट कारवाईसाठी काही ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ येते, यावरून प्रशासनाची दिरंगाई समोर येत आहे.