सहा देशांतील प्रतिनिधींचा शिवरायांना मुजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 11:28 PM2017-02-27T23:28:40+5:302017-02-27T23:28:40+5:30
चंदीगडला रोटेशिया परिषद : भारतासह श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भुतानमधील प्रतिनिधींचा सहभाग
सातारा : ‘शिवरायांचे आठवावे रुप, आठवावा प्रताप या भुमंडळी...’ शिवरायांच्या जीवनातील प्रसंग उभा राहिला तरी शरीरातील रक्त उफाळून येतं. यासाठी देशाच्या भौगोलिक सीमा गळून पडतात. याचाच प्रत्यय चंदीगडमध्ये आला. रोट्रॅक्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत साताऱ्याच्या तरुणांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर केली. यावेळी शिवरायांचे दर्शन होताच सहा देशांतील प्रतिनिधींनी उभे राहून सलामी दिली.
आशिया खंडातील प्रमुख देशांमधील रोट्रॅक्ट (रोटेशिया) आंतरराष्ट्रीय मल्टी डिस्ट्रीक्ट परिषद दि. २३ ते २६ फेबु्रवारी या कालावधीत चंदीगड येथे पार पडली. यामध्ये भारताबरोबरच बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भुतान या देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या परिषदेत सहभागी रोट्रॅक्टला पाच मिनिटांत कला सादर करण्याची स्पर्धा भरवली होती. यामध्ये महाराष्ट्रातून सातारा, औरंगाबाद, लातूर आदी जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या तीस तरुणांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर केला. अवघ्या पाच मिनिटांत तो बसवून सादर केला. औरंगाबादचे
केतन पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले.
महाराष्ट्राचे दर्शन घडवत कार्यक्रमाची सुरुवातच छत्रपती शिवरायांच्या रुबाबदार प्रवेशाने झाली. यावेळी शिवराज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ चा जयघोष सुरू झाला. संपूर्ण सभागृहात आवाज घुमत राहिला अन् उपस्थितांनी उभे राहून सलामी दिली.
या कार्यक्रमाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये साताऱ्यातून संतोष शिंदे, शंतनू खलीकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
साताऱ्याची मी गुलछडी...
या कार्यक्रमात साताऱ्यातून राज्यभरातून सहभागी झालेल्या तरुणींनी लावणी सादर केली. ‘साताऱ्याची मी गुलछडी...’ या लावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विठ्ठल-विठ्ठल...
विठू-माउलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर दूरून जाणारी वारी देखील मराठी माणसाच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. हा प्रसंगही यावेळी सादर करण्यात आला.