सेन्सॉर बोर्डावर कोल्हापूरला प्रतिनिधित्व द्या
By admin | Published: December 14, 2015 01:09 AM2015-12-14T01:09:08+5:302015-12-14T01:10:06+5:30
प्रफुल्ल महाजन : नाट्य परिषद शाखा अध्यक्षांच्या मेळाव्यात मागणी
कोल्हापूर : सेन्सॉर बोर्डावर कोल्हापूरला प्रतिनिधित्व द्या. स्थानिक पातळीवर प्रायोगिक नाटकांना अनुदान द्यावे. अखिल भारतीय नाट्य संमेलनासह विभागीय पातळीवर संमेलन व्हावी, आदी मागण्यांबाबतचे ठराव रविवारी नाट्य परिषदेच्या शाखा अध्यक्षांनी केले.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखांच्या अध्यक्षांचा मेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी होते.
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रफुल्ल महाजन यांनी सांगितले की, नाटकांचे विकेंद्रीकरण होत नसल्याने मुंबई, पुण्यातील नाटके कोल्हापूरसह अन्य ठिकाणी दाखविणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी अनुदान द्यावे. नाट्य परिषदेची घटना बदलणार आहे. यात राज्य नियामक मंडळावर प्रत्येक जिल्ह्याला शहर व ग्रामीण असे प्रतिनिधित्व मिळावे. सेन्सॉर बोर्डावर सांगली जिल्ह्यातील दोन, रत्नागिरीतील चार तसेच कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्याचे सदस्य आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याला अजून यश आलेले नाही. अखिल भारतीय नाट्य संमेलनासह विभागीय पातळीवर ठिकठिकाणी संमेलन घ्यावे. राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रथम क्रमाकांच्या नाटकांचा महोत्सव घेण्याची आमची तयारी आहे, पण संबंधित नाटकांना त्यांच्या निर्मितीचा खर्च शासनाने द्यावा. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या विना लोकूर, कोल्हापूर शाखेचे कार्यवाह शिवकुमार हिरेमठ, मनोहर कुर्इंगडे यांच्यासह सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.