व्यसनांचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार
By admin | Published: April 16, 2015 11:47 PM2015-04-16T23:47:28+5:302015-04-17T00:06:44+5:30
प्रबोधन रॅली : जनस्वास्थ्य दक्षता समितीचे आयोजन; विद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर : ‘तंबाखूच्या व्यसनांचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘खा गुटखा, मोज घटका’, ‘एक, दोन, तीन, चार, तंबाखूला करू हद्दपार’, अशा घोषणा देत जनस्वास्थ्य दक्षता समितीने गुरुवारी शहरातून प्रबोधन रॅली काढली. त्यात महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
खासदार दिलीप गांधी, शामचरण गुप्ता व रामप्रसाद सरमाह यांनी तंबाखूच्या व्यसनाचे समर्थन केले आहे. त्यांचा निषेध करण्यासह तंबाखूजन्य पदार्थांना प्रतिबंध असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ‘जनस्वास्थ्य’तर्फे रॅली आयोजित केली होती. दसरा चौकातून सकाळी पावणेअकरा वाजता रॅलीला प्रारंभ झाला. व्हीनस कॉर्नर, उद्योग भवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली आली. याठिकाणी प्रवेशद्वारावर समितीचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावरील नियंत्रण धोरणाच्या आखणीसाठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी, गुप्ता व सरमाह यांनी तंबाखूच्या व्यसनाचे समर्थन केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे यांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणे, थुंकणे, धूम्रपान करणे यावर प्रतिबंध असणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. रस्ते ही देखील सार्वजनिक ठिकाणे आहेत. रस्त्यावर थुंकल्यास अस्वच्छता, सार्वजनिक आरोग्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो म्हणूनच रस्त्यांवरही तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करावा.
रॅलीत ‘जनस्वास्थ्य’चे अध्यक्ष दीपक देवलापूरकर, सुरेश शिपूरकर, शामराव कांबळे, अजित अकोळकर, सुरेश पाटील, बृहस्पती शिंदे, डी. डी. टिपकुर्ले, सुधीर हांजे, अरविंद कायंदे, प्रतीक निंगुरे, अमर देसाई, करिष्मा चिरमुरे, ओंकार पाटील, सीमा गावडे, अवधूत गायकवाड आदींसह डी. डी. शिंदे कॉलेज, कृषी महाविद्यालय, शहाजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
असा दिला संदेश
सडोली खालसा विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या आजारांच्या दुष्परिणामांबाबत चेहरे रंगवून प्रबोधन केले. महाविद्यालयीन विद्यार्थी ‘गुटखा, तंबाखू, धूम्रपानाचे बळी, ‘खा गुटखा, मोज घटका’ अशा उल्लेखाचे फलक घेऊन सहभागी झाले होते.