म्हैसाळच्या गर्भपात केंद्रावर पुन्हा छापा
By admin | Published: March 7, 2017 12:05 AM2017-03-07T00:05:54+5:302017-03-07T00:05:54+5:30
औषधे, इंजेक्शन्स, कागदपत्रे जप्त; खिद्रापुरेचा आठ वर्षांपासून गर्भपाताचा उद्योग; दोन साथीदार ताब्यात
सांगली/मिरज/म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे गेली आठ वर्षे बेकायदा गर्भपाताचा उद्योग करीत असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिस व वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकून गर्भपात तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. गर्भपाताच्या या ‘रॅकेट’मध्ये काही डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गेल्या आठवड्यात खिद्रापुरे याने गर्भपात केला होता; पण या शस्त्रक्रियेदरम्यान स्वातीचा मृत्यू झाला होता. याचा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आले. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरल्याचे स्पष्ट झाले. रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने खुदाई केली, त्यावेळी १९ भ्रूण सापडले होते. सोमवारी दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे
यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने या रुग्णालयावर छापा टाकून तेथील कागदपत्रे व औषधांची तपासणी केली. यामध्ये खिद्रापुरे २००९ पासून महिलांचा गर्भपात करण्याचा उद्योग करीत होता, असे पुरावे मिळाले आहेत. काही डॉक्टरांचाही या रॅकेटमध्ये सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. त्यांची नावे शोधण्याचे काम सुरू आहे. खिद्रापुरे पत्नीसह फरारी झाला आहे. त्यांच्या शोधासाठी चार पथके विविध भागात रवाना केली आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व समितीने संयुक्तपणे रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी रूग्णालयात तळघरात व पहिल्या मजल्यावर दोन सुसज्ज शस्त्रक्रियागृहे, क्ष-किरण यंत्र, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन्स, भुलीच्या औषधांचा साठा यासह तळघरात एक हौद आढळला. रूग्णालयातील कागदपत्रे व संगणक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. (प्रतिनिधी)
चौकशीची मागणी
भाजप महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर, सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे, शिवसेनेच्या सुनीता मोरे, सुवर्णा मोहिते यांनी म्हैसाळ येथे भेट देऊन, आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचेही पाठबळ
म्हैसाळसारख्या गावामध्ये डॉ. खिद्रापुरे टोलेजंग रुग्णालय बांधू शकतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रकरणाला आरोग्य विभागाचे पाठबळ असल्याशिवाय असे प्रकार चालू शकत नाहीत. पोलिस प्रशासनाने येत्या चोवीस तासात फरारी डॉक्टरला अटक करू न त्याच्यावर कडक कारवाई करावी.
- अॅड. वर्षा देशपांडे
पत्नीचाही सहभाग
अवैध व्यवसायातून मिळालेली संपत्ती व राजकीय पाठबळाच्या जोरावर खिद्रापुरेने अनेक तक्रारी मिटविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. डॉ. खिद्रापुरे याची पत्नी होमिओपॅथी डॉक्टर असून, पतीच्या गैरहजेरीत तीसुध्दा गर्भपात करीत असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर दांपत्य अद्याप फरारी आहे.