Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:20 PM2023-01-23T12:20:19+5:302023-01-23T12:28:44+5:30
गैरसोय होऊ नये म्हणून अन्य व्यक्तींचे कपडे इस्त्रीसाठी न घेण्याचा निर्णय
उत्कर्षा पोतदार
उत्तुर : येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी देशप्रेमापोटी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देण्याचा निर्णय घेतला आहे. देश प्रेमापोटी स्वतः आर्थिक झळ सोसून उतार वयात आजच्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे, गंगाधर बापू परीट.
गंगाधर परीट यांचे मूळ गाव उत्तूर असले तरी कामानिमित्त ते मुंबई ला वास्तव्यास होते. मुंबईत नोकरी करीत असतानाच ते फावल्या वेळेत घराशेजारील इस्त्रीच्या दुकानात दररोज दोन तास काम करीत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मूळ गावी उत्तूरला यायचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर गारगोटी रोडवरील एका इमारतीमध्ये 'ओम लॉन्ड्री' या नावाने इस्त्रीचे दुकान थाटले. त्यांच्या सुनबाई सैन्यात आहेत व सुनबाईंचे वडीलही सैन्यात होते. त्यांच्या प्रेरणेतून आपणही देश सेवेसाठी काहीतरी करावे अशी कल्पना या ७० वर्षी आजोबांना सुचली.
त्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देण्याचे ठरविले. ता.२३ जानेवारी ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देणार आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्य व्यक्तींचे कपडे इस्त्री साठी न घेण्याचे ठरविले आहे. गंगाधर आजोबांच्या या अनोख्या मोहिमेची चर्चा उत्तूर मध्ये सर्वत्र सुरू आहे.