समितीसह राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला : बेळगाव मनपाच्या ५८ जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:09+5:302021-09-03T04:25:09+5:30

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार असून, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची ...

Reputation of political parties including committee tarnished: Polling for 58 seats of Belgaum Municipal Corporation today | समितीसह राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला : बेळगाव मनपाच्या ५८ जागांसाठी आज मतदान

समितीसह राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला : बेळगाव मनपाच्या ५८ जागांसाठी आज मतदान

Next

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार असून, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रीय पक्षांनी पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर बेळगाव महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक आल्यामुळे या दोन्ही पक्षांना कितपत यश मिळते, याकडे बेळगावसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नाचा मुद्दा समोर ठेवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यावेळी पहिल्यांदाच २३ अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या निकालाकडे लोकांचे लक्ष आहे. मराठी भाषिकांसाठी ही निवडणूक जणू अस्तित्वाचा लढा बनली आहे.

निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार असल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. निवडणुकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून १,८२६ निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. काल (बुधवारी) मतदान केंद्रावर सर्व साहित्य रवाना करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी पूर्वतयारीसाठी रवाना झाले आहेत. शहरात ४०२ मतदान केंद्र तयार ठेवण्यात आली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांसाठीचे कक्ष तयार करण्यात आले असून, मतदान केंद्रनिहाय स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आले आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी बेळगाव शहरातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचा फायदा निवडणूक विभागाला महापालिका निवडणुकीत झाला आहे. कोरोना काळात निवडणूक होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येक केंद्राला कोरोना किट देण्यात आले आहे. त्यात सॅनिटायझर व अन्य सामग्रीचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरणही केले जाईल.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी समस्त मतदारांनी निर्भयपणे आणि न चुकता मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, प्रांताधिकारी रवी कर्लिंगणार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीची सर्व ती जय्यत तयारी झाली आहे. मतदारांनी या निवडणुकीत निर्भय आणि नि:पक्षपणे न चुकता मतदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचीची पूर्णपणे अंमलबजावणी केली जात आहे. मतदान यंत्रेही निर्जंतुक करण्यात आली आहेत. मतदारांनी याबाबतीत कोणतीही भीती न बाळगता मोठ्या संख्येने मतदान करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्थात ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे निर्भयपणे आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकूण ६ केएसआरपी प्लाटून, ३०० होमगार्ड, ७५ अतिरिक्त कर्मचारी महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाणार आहेत.

सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

निवडणुकीत अनेक गैरप्रकार होऊ शकतात. बोगस मतदान, संवेदनशील मतदान केंद्रांवर गोंधळ तसेच दोन गटात हाणामाऱ्या आणि मारहाण अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. असे प्रकार होऊ नयेत आणि निवडणूक शांततेत पार पडली जावी, यासाठी सर्व व्यवस्था चोख केली जाणार आहे.

कोणीही गैरप्रकार करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

फोटो: बेळगाव मनपा निवडणूक मतदानाची तयारी

Web Title: Reputation of political parties including committee tarnished: Polling for 58 seats of Belgaum Municipal Corporation today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.