राखीव बटालियनच्या जवानाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:10 PM2019-04-29T23:10:22+5:302019-04-29T23:10:27+5:30
कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस ...
कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
जवान सुशील भेंडे हे २०१३ मध्ये भारत राखीव बटालियन-३ मध्ये भरती झाले. सहा वर्षे त्यांनी सेवा बजावली. भारत राखीव बटालियनचे मुख्य कार्यालय कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात आहे. या बटालियनचे जवान दौंड येथे असतात. या ठिकाणी सेवेत असताना सुशील भेंडे याची एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वादावादी झाली. १० दिवसांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती; त्यामुळे तो गावी येऊन राहिला होता. जादा ड्यूटी लावल्याच्या तणावातून त्याची अधिकाºयाशी वादावादी झाली होती. निलंबित केल्याने त्याची मानसिकता ढासळली होती. घरीदेखील तो मानसिक तणावाखाली होता. जास्त कोणाशी बोलत नव्हता. सोमवारी सकाळी त्याने शेतामध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
जवानांना न्याय द्यावा
भारत राखीव बटालियनच्या जाचक अटी व त्रासाबद्दल कोणी बोलले, तर त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करून प्रसंगी नोकरी गमवावी लागते. या जवानांची नोकरी २४ तास आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार शासन करीत नाही. जिल्हा बदली १५ वर्षांनी केली आहे. ती १० वर्षांनी करावी, म्हणून जवान शासनदरबारी न्याय मागत आहेत. कामाच्या अतिरिक्ततणावामुळे अनेक जवानांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर काहींनी प्रयत्न केला आहे. त्याचाच सुशील भेंडे बळी आहे. शासनाने या जवानांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जवानांतून होत आहे.