पूरग्रस्त कुंभार देताहेत गणेशमुर्तींना पुन्हा आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:02 AM2019-08-20T01:02:25+5:302019-08-20T01:03:38+5:30
घरभर पसरलेली घाण, तीन-तीन फुट मातीचा थर आणि बुडालेला संसार बघतानाच काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांना गणेशमूर्ती देणार कशी याची चिंता या त्यांना लागून राहिली होती.
कोल्हापूर : महापुराने वाहून नेलेला संसार पुन्हा सावरत कुंभारबांधवांनी भक्तांचा लाडका गणपती बाप्पा त्यांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी मूर्ती घडविण्याचा नव्याने श्रीगणेशा केला आहे. एकीकडे घरादाराची स्वच्छता तर दुसरीकडे वाचलेल्या गणेशमूर्तींना पुन्हा फर्निश करण्यात सगळ्यांचे हात गुंतले आहेत तर ज्या काही थोड्या मूर्ती शिल्लक राहिल्या त्यांची विक्री सुरू झाली आहे. विस्कटलेल्या संसाराचे दु:ख मागे सारत गणेश भक्तांसाठी आणि देवासाठी कुंभारबांधवांनी कंबर कसली आहे.
रविवारी (दि.४) महापुराचे पाणी वेगाने वाढू लागल्यावर कुंभारबांधवांनी आपल्या तयार मूर्ती वरच्या मजल्यावर, माळावर सरकवून ठेवल्या होत्या. मात्र पाण्याने घरांचा पहिला मजलाही आपल्या प्रवाहात घेतल्याने माळ्यावरच्या गणेशमूर्तींवरदेखील पाणी चढून मातीचा थर चढला आहे. अकरा दिवस बाहेर घालवल्यानंतर गुरूवारी बापट कॅम्प, शाहूपुरीतील कुंभार बांधव घरी परतले. घरभर पसरलेली घाण, तीन-तीन फुट मातीचा थर आणि बुडालेला संसार बघतानाच काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांना गणेशमूर्ती देणार कशी याची चिंता या त्यांना लागून राहिली होती.
अजूनही कुंभार गल्ल्यांमधील घराघरांत पुराची घाण काढण्याची, भांडी, धुणी, साफसफाईची कामे सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर ज्यांनी गणेशमूर्ती ठेवल्या होत्या. त्या मूर्ती सुदैवाने बचावल्या आहेत, या तयार मूर्ती काहीजणांनी दारात विक्रीस ठेवल्या आहेत. एकीकडे घरादाराची स्वच्छता आणि दुसरीकडे गणेशमूर्ती अशा दुहेरी पातळीवर आता कुंभारांची कसरत सुरू आहे. अनेकजणांनी ठरलेल्या मंडळांना आणि घरगुती भक्तांना यंदा गणेशमूर्ती मिळणार नाही, असे सांगितले आहे.
काहीजण पुन्हा नव्याने शाडूच्या व प्लास्टरच्या मूर्ती बनवत आहेत. मात्र, या मूर्ती काही प्रमाणात ओल्याच असणार आहेत. मूर्ती ओली असली की रंग व्यवस्थित बसत नाही ही खरी अचडण आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर संसाराची घडी बसवून गणेशमूर्ती नव्याने घडविण्यासाठी कुंभार बांधवांची खटपट सुरू आहे.
विरघळलेली शाडू... उडालेले रंग
शाडूच्या गणेशमूर्तींची मागणी वाढल्याने या मूर्ती मोठ्या प्रमाणात बनविण्यात आल्या होता. पुराच्या पाण्यामुळे आता मूर्तीचे रूपांतर पुन्हा मातीत झाले आहे. शाडूच्या दिवसात दोन किंवा तीन गणेशमूर्ती बनतात. या मूर्ती लवकर वाळत नाहीत. प्लास्टरच्या मूर्ती वेगाने बनत असल्या तरी त्यांनाही वाळायला काही कालावधी लागतो.
मूर्तींचा तुटवडा... दरात वाढ
कष्टाने बनविलेल्या मूर्ती पाण्याने हिरावून नेल्या, घरादाराची वाताहत झाल्याने कुंभार बांधवांना मोठा फटका बसला आहे. नव्या मूर्ती बनवण्यासही वेळ नसल्याने यंदा गणेशमूर्तींचा तुटवडा कोल्हापुरात जाणवणार आहे. अन्य गावांतून गणेशमूर्तीं आणून त्यांची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे मूर्तींच्या दरातही वाढ होणार आहे.
घरगुती आणि मंडळांच्या अशा जवळपास शंभरहून अधिक गणेशमूर्ती खराब झाल्याने त्या खणीत विसर्जनासाठी दिल्या. मार्केट यार्डमध्ये काही मोठ्या मूर्ती वाचल्या आहेत. आता त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.
- उदय कुंभार
माझ्याकडे मोठ्या गणेशमूर्तींचे काम असते. त्यातील पाच-सहा मूर्ती खराब झाल्या आहेत. उरलेल्या मूर्तींना पुन्हा घासून फर्निश करून नव्याने रंग द्यावे लागणार आहे. रात्रंदिवस काम केले तरच वेळेत मूर्ती देता येतील.
- सचिन पुरेकर
तयार घरगुती गणेशमूर्ती आम्ही मागच्या घरात ठेवल्या होत्या; पण भाविकांना त्या देण्याआधीच पाण्याने घेरले. अकरा फुटांच्या मूर्तीही खराब झाल्या. आता वेळही नसल्याने नव्याने मूर्ती बनविता येणार नाही.
- मिलिंद कुंभार
महापुराचे पाणी वेगाने वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने वरच्या मजल्यावर तयार मूर्ती नेवून ठेवल्याने त्या वाचल्या. या मूर्ती चांगल्याच असून, त्या आम्ही आता विक्रीला ठेवल्या आहेत.
- सुरेखा बावडेकर