डीकेटीईच्या विद्यार्थ्यांकडून नॉन ओव्हन सोलर वॉटर प्युरिफायरचे संशोधन
By admin | Published: July 28, 2016 12:14 AM2016-07-28T00:14:47+5:302016-07-28T00:55:44+5:30
पॉलिएस्टर व्हिस्कोस ब्लेंडेड निडलपंच फॅब्रिकची निर्मिती करण्यात आली
इचलकरंजी : डीकेटीईच्या सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉन ओव्हनमध्ये येथील डीकेटीईच्या विद्यार्थ्याने नॉन ओव्हन सोलर वॉटर प्युरिफायर बनविण्यात यश मिळविले. त्यामुळे नॉन ओव्हन वॉटर फिल्टर कापडाचा वापर करून पाणी शुद्धिकरणासाठी स्वस्त व सुलभ तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांना स्वच्छ व पिण्यायोग्य चांगले पाणी उपलब्ध होणार आहे.पिण्याचे पाणी हा आरोग्याशी निगडित अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण भागामध्ये महागडे फिल्टर विकत घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय करणे, तसेच या फिल्टरचा देखभाल खर्च करणेदेखील अवघड असते. याचा विचार करून प्रवीण भोकरे या विद्यार्थ्याने प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एम. वाय. गुडियावार, प्रा. एल. जी. पाटील व प्रा. ए. एस. भुते यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे वॉटर प्युरिफायर बनविले. त्यासाठी सोलर या रिनिव्हेबल एनर्जीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये स्वच्छ पाणी या फिल्टरमुळे मिळत आहे. मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही पावसाच्या पाण्याइतकीच स्वच्छ आहे. डिस्टीलेशन या तत्त्वाचा वापर करून या विद्यार्थ्याने नॉन ओव्हन सोलर वॉटर प्युरिफायर बनविला आहे. त्यासाठी पॉलिएस्टर व्हिस्कोस ब्लेंडेड निडलपंच फॅब्रिकची निर्मिती करण्यात आली व त्याद्वारे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून पाणी शुद्ध करण्यात आले. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने डीकेटीईला सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉन ओव्हन हा २५ कोटी रुपयांचा प्रकल्प दिला आहे. त्यामुळेच विद्यार्थ्याला हे संशोधन करता आले, अशी माहिती प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दिली. (प्रतिनिधी)