संशोधन हे प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नको
By admin | Published: March 29, 2015 11:53 PM2015-03-29T23:53:01+5:302015-03-30T00:11:25+5:30
अशोक भोईटे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर : संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुतीच्या शेतीवर कुठल्याही अनियमित हवामानाचा दुष्परिणाम होत नाही. तसेच या शेतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाया जात नाहीत. अगदी तुतीच्या पानापासून ते रेशीमकिड्यांच्या विष्ठेपर्यंत सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. तसेच रेशीमधाग्याला बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता या प्रकाराच्या शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘तुतीच्या पानापासून औषधी गोळ्यांचे उत्पादन’ या विषयावर आधारित मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ, पुणेचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. डी. जाधव, शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. ए. भागवत यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक प्रा. यू. एस. पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, आदी जिल्ह्यांतील २००हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)