कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या तामिळनाडूत तीन नव्या दुर्मीळ पाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:31 PM2022-06-22T17:31:15+5:302022-06-22T17:31:36+5:30

या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या आता ४८ झाली आहे.

Researcher from Kolhapur discovered three new rare pali in Tamil Nadu | कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या तामिळनाडूत तीन नव्या दुर्मीळ पाली

कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या तामिळनाडूत तीन नव्या दुर्मीळ पाली

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनसाठी काम करणारे कोल्हापुरातील संशोधक अक्षय खांडेकर यांच्यासह तेजस ठाकरे आणि इशान अगरवाल (बंगळुरू) यांनी तामिळनाडू येथे नव्या तीन दुर्मीळ पालींचा शोध लावला आहे. या संशोधनामुळे पश्चिम घाटातील या प्रजातीची संख्या आता ४८ झाली आहे.

खांडेकर हे शिवाजी विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे विद्यार्थी आहेत. यापूर्वीही त्यांनी काही पालींचा शोध लावला आहे. त्यांना सहायक संशोधक सतपाल गंगनमाळे यांनीही सहकार्य केले आहे. तामिळनाडूतील मुंदनथुराई टायगर रिझर्व्हमध्ये आढळलेल्या या दुर्मीळ पाली निमाॅस्पिस प्रजातीच्या असून, त्या प्रदेशनिष्ठ आहेत. 'निमाॅस्पिस अळगू', 'निमाॅस्पिस कलकडेनसीस' आणि 'निमाॅस्पिस मुंदनथुराईएनसीस' असे त्यांचे नामकरण केले आहे. या प्रजातीच्या जगात १५०हून अधिक पाली आहेत.

शरीराचा रंग, खवल्यांची संख्या, इतर वैशिष्ट्ये आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या पाली वेगळ्या असल्याचे तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर सोमवारी (दि. २० जून २०२२) जर्मनीच्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित झाला.


अळगू या तमिळ शब्दाचा अर्थ सुंदर असा आहे. त्यामुळे केवळ तिरुकुरुंगुडी राखीव जंगलात आढळणाऱ्या या पालीला 'निमाॅस्पिस अळगू' असे नाव तिच्या सौंदर्यावरून ठेवले आहे. समुद्र सपाटीपासून २००-३०० मीटर उंचावरील शुष्क पानगळी जंगलातील दगडांवर ती आढळून येते. ही एक दिनचर पाल असून, छोट्या कीटकांवर जगते.


भारतात विशेषत: पश्चिम घाटात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असून, पाली, इतर सरपटणारे प्राणी तसेच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन

Web Title: Researcher from Kolhapur discovered three new rare pali in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.