कोल्हापूरच्या संशोधकाने शोधली केणा कुळातील नवीन वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:52+5:302021-03-24T04:21:52+5:30

संदीप आडनाईक लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातच आढळणाऱ्या केणा कुळातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध ...

Researcher from Kolhapur discovered a new plant belonging to the Kena family | कोल्हापूरच्या संशोधकाने शोधली केणा कुळातील नवीन वनस्पती

कोल्हापूरच्या संशोधकाने शोधली केणा कुळातील नवीन वनस्पती

googlenewsNext

संदीप आडनाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातच आढळणाऱ्या केणा कुळातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकूर येथील डॉ. मयूर नंदीकर या वनस्पती संशोधकाने लावला आहे. यासंदर्भातील लेख नीळावंती या नावाने अमेरिकेच्या ब्रिटोनिया विज्ञान ग्रंथात १९ मार्च रोजी प्रसिद्ध झाला आहे. ही अनोखी, नवीन आणि प्रदेशनिष्ठ प्रजात कॉमेलीना यंगी (Commelina youngii Nandikar) या नावाने यंग यांना समर्पित करण्यात आली आहे.

डॉ. नंदीकर हे केणा कुळातील वनस्पतींचे अभ्यासक आहेत. सध्या ते सातारा जिल्ह्यातील नवरोजी गोदरेज सेेंटर फॉर प्लांट रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. लंडनच्या ब्रिटिश वनस्पती संग्रहालयाला १८ जून २०१९ रोजी डॉ. नंदीकर यांनी भेट दिली, तेव्हा भारतातील केणा कुळातील वनस्पती संग्रहात अल्फ्रेड प्रेन्टिस यंग या संग्रहाकाने १९ नोव्हेंबर १८७९ रोजी सुनाल (बेळगाव, कर्नाटक) येथून जमा केलेली वेगळी प्रजाती पाहण्यात आली.

या १४० वर्षे जुन्या असलेल्या या मृत वनस्पती यंग यांनी निपाणी, फोंडा, पाटगाव, पाली, पाटगाव, भुदरगड, निढोरी, धारवाड या परिसरातून जमा केल्या हाेत्या. भारतात आल्यानंतर अभ्यास करता करता डॉ. नंदीकर यांना बागलकोट परिसरात याच प्रजातीची जिवंत वनस्पती आढळल्याने ही नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.

१८७९ मध्ये यंग यांना आढळलेल्या या वनस्पतीच्या पानाचा आकार, देठ, फुले, शिरा, बिया या भारतात सापडणाऱ्या केणा कुळातील वनस्पतींपेक्षा वेगळी होती. यातून मृत वनस्पती आणि त्यांची साठवणूक यांचे महत्त्व स्पष्ट होते.

सीमाभागातील उष्ण तापमान असलेल्या वालुकामय प्रदेशात १५ सेंटिमीटरपर्यंत वाढणाऱ्या या वनस्पतीच्या बिया मऊ आणि गुळगुळीत असतात. देठाच्या शिरा गडद लाल रंगाच्या, तर फुले निळ्या रंगांची असतात. भारतात आढळणाऱ्या सर्वांत लहान आकाराची ही वनस्पती आहे. या कुळातील सुमारे ३० ते ४० प्रजाती आढळतात. डॉ. नंदीकर यांनी यापूर्वी यातील तीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्या कर्नाटकातील बदामी, सूतगट्टी आणि अंदमान येेथे आढळल्या होत्या.

यासंदर्भातील डॉ. नंदीकर यांचा संशोधनपर लेख न्यूयॉर्कच्या ब्रिटोनिया विज्ञान ग्रंथात १५ मार्च २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. यात पूर्वार्धात अल्फ्रेड यंग यांच्या वनस्पती संग्रहाविषयी तर उत्तरार्धात केणा कुळातील या प्रदेशनिष्ठ वनस्पतींविषयी माहिती प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी डॉ. नंदीकर यांना नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्राचे संचालक विजय व स्मिता कृष्णा, गोदरेज फाउंडेशनचे डॉ. हेनरी नॉल्टी, लंडनचे वनस्पती अभ्यासक डॉ. नॉर्बर्ट होलस्टिन, राणी तिवारी व फ्रान्सेका हिलर यांचे सहकार्य लाभले.

-------------------------------------------------

फोटो : २३ मयूर नंदीकर

फोटो : २३ अल्फ्रेड यंग

फोटो : २३ कॉमेलीना यंगी: केनी वनस्पतीची नवीन प्रजात

Web Title: Researcher from Kolhapur discovered a new plant belonging to the Kena family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.