संशोधकांनी शोधली पर्णरेषी बोटांच्या पालीची नवी प्रजात, कोल्हापूरातील तिघांचा सहभाग
By संदीप आडनाईक | Published: May 11, 2023 02:50 PM2023-05-11T14:50:22+5:302023-05-11T14:50:48+5:30
ही प्रजाती निशाचर असुन छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधकाना तामिळनाडूतील थुतुकुडी (तुतिकोरीन) जिल्ह्यातून पर्णरेषी बोटांच्या पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. या नव्या पालीच्या प्रजातीला हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस (क्वार्टझाइट ब्रुकीश गेको) असे नाव देण्यात आले आहे. या संशोधनामधेकोल्हापूरचे संशोधक अक्षय खांडेकर, स्वप्निल पवार, सतपाल गंगलमाले यांचा समावेश आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, विवेक वाघे आणि रेप्टाईल कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाचे रामेश्वरम मरीआप्पन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले.
पृष्ठभागाला धरुन ठेवण्यासाठी आवश्यक असणारे बोटांवरील लॅमेले विभागलेले असल्यामुळे या प्रजातीचा समावेश हेमिडॅक्टिलस या पोटजातीत केलेला आहे. गारगोटीसदृश्य खडकांच्या (क्वार्टझाइट) अधिवासात आढळत असल्यामुळे या प्रजातीला क्वार्टझाइटीकोलस असे नाव दिलेले आहे. या पालींच्या बोटांच्या खाली असणारे लॅमेले वृक्षांच्या पानांवरील रेषांशी साधर्म्य साधतात म्हणून त्यांना 'पर्णरेषी बोटांच्या पाली' म्हणतात. घरांमधे भिंतीवर दिसणाऱ्या पाली याच पोटजातीतील आहेत. या प्रजाती घरांत आढळणार्या छोट्या 'ब्रुकीश' पालींच्या गटात मोडतात. या त्यांच्या जवळच्या भाईबंदांपासून हेमिडॅक्टीलस ग्लेडोई हे८०० किमी उत्तरेकडून मध्य भारत आणि पाकिस्तानातून ज्ञात आहेत.
जनुकीय संच, आकारशास्त्रानुसार वेगळी पाल
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान ही पाल प्रथमतः आढळली. पाठीवरील ट्युबरकलची वैशिष्टपूर्ण रचना, त्यांचा आकार, जनुकीय संच आणि आकारशास्त्राच्या अभ्यासाअंती ही प्रजाती इतर पालींपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले. तज्ञांच्या पुष्टीनंतर जर्मनीच्या व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून याविषयी शोधनिबंध प्रकाशीत झाला आहे. ही प्रजाती थुतुकुडी जिल्ह्यातील ४० किमी अंतरावरील दोन टेकड्यांवरुन नोंदवली.
या नव्या प्रजातीच्या पाली शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांवरील क्वार्टझाइटच्या खडकांवरती सापडतात. या टेकड्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५० मीटर पेक्षा कमी आहे. ही प्रजाती निशाचर असुन छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. क्वार्टझाईटच्या उघड्या खडकांवरती भक्ष्य पकडण्यासाठी, या पाली रात्री बाहेर पडतात आणि दिवसा खडकांच्या भेगांमधे विश्रांती घेतात. या नव्या शोधामुळे, शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांच्या आणि क्वार्टझाइट खडकांच्या अधिवासाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झालेले आहे.