शिवसेनेतील नाराजी उफाळली

By admin | Published: October 13, 2015 12:36 AM2015-10-13T00:36:56+5:302015-10-13T00:37:17+5:30

महापालिका निवडणूक : बिडकर यांची उमेदवारी डावलल्याने उपशहरप्रमुख पदाचा राजीनामा

The resentment of Shiv Sena was lifted | शिवसेनेतील नाराजी उफाळली

शिवसेनेतील नाराजी उफाळली

Next

कोल्हापूर : शिवसेनेच्या अंतिम यादीतील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या व्हीनस कॉर्नर प्रभागाचा निर्णय सोमवारी झाला. उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर यांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या राहुल चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथून उमेदवारी जाहीर झाली.
शिवसेनेकडून काल, रविवारी २२ जणांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये ‘व्हीनस कॉर्नर’ प्रभागाचा निर्णय झाला नाही. येथून उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर व काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेले राहुल चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरू होती. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राहुल चव्हाण यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबतचे पत्र सचिव खा. विनायक राऊत यांच्या सहीने जिल्हाप्रमुख संजय पवार व आ. राजेश क्षीरसागर यांना पाठविण्यात आले. त्याबचरोबर शशिकांत बिडकर इच्छुक असल्यास त्यांना शेजारील कनाननगर प्रभागातून उमेदवारी देण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.
बिडकर यांचा राजीनामा
महापालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, ही मनापासून इच्छा आहे. परंतु, ज्यांचा पक्षाशी काडीमात्र संबंध नाही, अशा उपऱ्यांना उमेदवारी दिल्याचे दु:ख आहे. माझ्या मतदारसंघात दुसरा कोणताही शिवसैनिक असता तर त्याग केला असता. मात्र, आपल्यालाच उमेदवारी डावलल्याने आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मी सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण, शिवसेनाप्रमुखांचे विचार, धोरण याकडे आकर्षित होऊन शिवसेनेचे काम करू लागलो. गेली २५ वर्षे हे काम अविरतपणे करीत आहे. निश्चित माझी आर्थिक परिस्थिती कमी असेल. परंतु, शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या कामाच्या जोरावर जमा केलेले कार्यकर्त्यांचे मोहोळ ही आपली संपत्ती आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी निश्चित मला व माझ्यासारख्या सच्च्या शिवसैनिकाला मिळणार, याची खात्री होती. परंतु, सर्व पक्षांनी इलेक्टिव्ह मेरिट नाही म्हणून नाकारलेल्या उमेदवारांना आमच्याकडे बाकी इलेक्टिव्ह मेरिट लावले गेले. सत्तेसाठी आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांचा बळी देण्यात आला, हे दुर्दैवी आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडले आहे. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून, याबाबतच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आल्या आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

काँग्रेसची दोन जागांसाठी उमेदवारी जाहीर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सोमवारी रात्री प्रलंबित दोन प्रभागांतील उमेदवारांची चौथी व अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक ४५ (कैलासगडची स्वारी मंदिर) मधून सुरेश रामचंद्र साबळे, तर प्रभाग क्रमांक ८१ (क्रांतिसिंह नाना पाटीलनगर - जिवबा नाना पार्क) येथून श्रीनंद शामराव कांबळे (जोगेंद्र कवाडे गट) यांची उमेदवारी जाहीर केली.
राष्ट्रवादीची यादी; प्राजक्ता लाड, तुषार लोहारांना संधी
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपली तिसरी अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध केली. यामध्ये प्राजक्ता सचिन लाड व तुषार रामचंद्र लोहार यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने यापूर्वी दोन याद्यांतून ७९ उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली होती. उर्वरित पोलीस लाईन व बलराम कॉलनी हे प्रभाग प्रलंबित ठेवले होते. प्रभाग क्रमांक ६ (पोलीस लाईन) मधून प्राजक्ता सचिन लाड व प्रभाग क्रमांक ५२ (बलराम कॉलनी) येथून तुषार रामचंद्र लोहार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संधी देण्यात आली आहे.

Web Title: The resentment of Shiv Sena was lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.