सर्व लिंगायत पोटजातींना आरक्षण द्या
By Admin | Published: February 10, 2017 12:34 AM2017-02-10T00:34:22+5:302017-02-10T00:34:22+5:30
लिंगायत एकीकरण समितीची मागणी : प्रशासनाला निवेदन, धरणे आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : लिंगायत समाजातील सर्व जाती, उपजाती, पोटजातींना आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह लिंगायत समाजास संविधानिक धर्ममान्यता तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा, अशी मागणी गुरुवारी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. मेपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तालुका व जिल्हा पातळीवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. लिंगायत एकीकरण समिती, महाराष्ट्रतर्फे राज्यभर लिंगायत आरक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विविध अठरा मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी प्रा. संगमेश्वर पानगावे, सुनील नष्टे, राजू वाली, रामलिंग गुजर, धर्मेंद्र नष्टे, आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. परंतु तो वीरशैव, लिंगधर, लिंगवत, लिंगडेर, लिंगायत पंचम अशा अनेक जाती, उपजाती, पोटजातींत विखुरला आहे. यांपैकी काहींना आरक्षणाचा लाभ मिळतो, तर काहींना त्यापासून वंचित राहावे लागते आहे. अशा सर्वच जाती व उपजातींना आरक्षण देऊन त्यांचा ‘ओबीसी’मध्ये समावेश कराव व समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या मागासलेपण दूर करावे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मेमध्ये तालुका व जिल्हा पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येईल.
अन्य मागण्या अशा :
मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे.
लिंगायत समाजासाठी गाव तिथे स्मशानभूमी, वसतिगृहांची निर्मिती व्हावी.
‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करावी
लिंगायत तत्त्वज्ञानाचे, साहित्याच्या अध्ययन व अध्यासन केंद्रांची स्थापना करावी.
कोल्हापुरातील लिंगायत समाज एकीकरण समितीच्या शिष्टमंडळातर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी रामलिंग गुजर, राजू वाली, धर्मेंद्र नष्टे, प्रा. संगमेश्वर पानगावे, सुनील नष्टे उपस्थित होते.