आरक्षण, प्रभाग रचनेवर न्यायालयात जाणार
By admin | Published: October 24, 2016 12:47 AM2016-10-24T00:47:01+5:302016-10-24T00:47:01+5:30
जि. प., पंचायत समिती निवडणूक : काही तक्रारदारांची तयारी; उद्या पुण्यात सुनावणी
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना व आरक्षणावर तब्बल ७७ हरकती दाखल झाल्या असून, यावर विभागीय आयुक्तांकडे उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये समाधान न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी काही तक्रारदारांनी केली आहे.
प्रभाग रचना करताना केवळ लोकसंख्या जुळविण्यासाठी गावांची ओढाताण केल्याची तक्रार नागरिकांची आहे. भौगोलिक संलग्नता न पाहताच प्रभाग रचना केल्याने अनेक गावांवर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर आरक्षण सोडत काढताना मागील तीन निवडणुकीतील आरक्षणाचा विचार केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण अनेक मतदारसंघ गेली दोन-तीन वर्षे राखीवच राहिले, तर काही मतदारसंघ सलग खुले राहिल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. परिते (ता. करवीर) जिल्हा परिषद मतदारसंघात असा प्रकार ठळकपणे जाणवतो. परिते जिल्हा परिषद मतदारसंघ २००२ ला कळंबे तर्फ ठाणे या नावाने होता, त्यावेळी इतर मागासवर्गीय आरक्षित होता. २००७ ला मतदारसंघाची पुनर्रचना होऊन परिते जिल्हा परिषद मतदारसंघ करण्यात आला आणि इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव ठेवला. २०१२ ला अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवला. आताच्या आरक्षण सोडतीत वास्तविक हा मतदारसंघ खुला होणे गरजेचे होते; पण पुन्हा इतर मागासवर्गीयसाठी राखीव राहिल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांनी आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर थेट न्यायालयात दाद मागण्याची तयारी अनेक मतदारसंघातील तक्रारदारांनी केली आहे. (प्रतिनिधी)