केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:39+5:302021-06-17T04:16:39+5:30

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ...

Reservation for Marathas only if the Central Government corrects the incident | केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

Next

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या वेळी खासदार संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सुकता जास्त होती, पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

आंबेडकर म्हणाले, आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला कायमच पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे, पण कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, सवलती मिळवून देणारे आरक्षण देणे सद्य:स्थितीत अवघड आहे. कारण केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून आरक्षणाच्या बाबतीतील राज्य सरकारांचे अधिकारच काढून घेतले आहेत. राज्याला आता कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तसे द्यायचे असल्यास घटना दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मराठ्यांना कायद्याच्या चाैकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, यासाठी येथून पुढे पाठपुरावा करावा लागणार आहे.

चौकट

महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण

कोल्हापुरातून मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकताना आंबेडकर व संभाजीराजे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. आंदोलन मराठ्यांचे असलेतरी त्याला उपस्थितांची मांदियाळी पाहिल्यावर महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण लावण्याची मुहूर्तमेढच रोवली गेल्याचे दिसत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली. वंचितमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे बरेचसे उमेदवारी कमी मतांनी पराभूत झाल्याने आंबेडकर यांच्यावर राग कायम आहे, पण राजकारणात कोणी कायमचा शत्रू वा मित्र नसतो, याच उक्तीप्रमाणे आता बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दोन्ही कॉंग्रेस व आंबेडकर यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Reservation for Marathas only if the Central Government corrects the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.