आरक्षण एकट्या भाजपचे यश नव्हे : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:02 PM2018-12-02T23:02:40+5:302018-12-02T23:02:47+5:30
आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव ...
आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव टाकल्यावर मग सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. असे असताना भाजपने त्याचे श्रेय घ्यायला हे काही एकट्या भाजपचे यश नव्हे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जाहिराती व डिजिटल फलकांची हवा १५ दिवस राहील. त्यामुळे तिचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या सभेसाठी आलेल्या पाटील यांनी सभा झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ज्यांनी मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली, तेच आता आरक्षण दिल्यावर त्याच्या श्रेयासाठी धडपडत आहेत.
आमचे सरकार असतानाही हा निर्णय झाला होता; परंतु त्यावेळी आम्ही कुठेही अशी जाहिरातबाजी केली नव्हती; कारण ते समाजाचे काम आहे, अशी आमची भावना होती. मराठा, धनगर, मुस्लिम समाजांचे कोणतेही प्रश्न या सरकारने गेल्या चार वर्षांत सोडविलेले नाहीत.
त्यामुळे हे समाजघटक नाराज असल्याने राज्यात भविष्यात सत्ता येणार नाही, अशी धास्ती वाटल्यानेच भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.
दु:ख, पण इलाज नाही
माजी खासदार निवेदिता माने यांनी पक्ष सोडल्याबद्दल त्यांना विचारले असता पाटील यांनी दु:ख आहे; पण इलाजही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
राणे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा नाही
सिंधुदुर्गची लोकसभेची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसच तेथील उमेदवाराबाबत निर्णय घेऊ शकेल. परंतु या जागेवरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दोन्ही काँग्रेसनी पाठिंबा द्यायचा, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.