कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर दर्शन मंडपासाठी विद्यापीठासमोरील जागेवर आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:19 AM2019-06-05T11:19:28+5:302019-06-05T11:21:52+5:30

करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार विद्यापीठ हायस्कूलसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेवरील वाहनतळाचे आरक्षण काढून तेथे दर्शन मंडप हा बदल करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची नोटिस महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर एक महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

Reservation on the premises of the University for the Darshan Tent | कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर दर्शन मंडपासाठी विद्यापीठासमोरील जागेवर आरक्षण

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर दर्शन मंडपासाठी विद्यापीठासमोरील जागेवर आरक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देदर्शन मंडपासाठी विद्यापीठासमोरील जागेवर आरक्षणमहापालिकेकडून प्रक्रिया सुरू : हरकती, सूचना मागविल्या

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार विद्यापीठ हायस्कूलसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेवरील वाहनतळाचे आरक्षण काढून तेथे दर्शन मंडप हा बदल करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची नोटिस महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर एक महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याची सुरुवात दर्शन मंडपापासून होणार आहे. त्यासाठी मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे. कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित विकास योजनेत या जागेवर भाविकांच्या सोईसाठी वाहनतळाचे आरक्षण टाकण्यात आले होते. आता तेथे दर्शन मंडप उभारण्यात येणार असल्याने त्यात बदल करून वाहनतळाऐवजी दर्शन मंडपाचे आरक्षण टाकण्यात येणार आहे.

या बदलाची नोटिस महापालिकेकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास एक महिन्याच्या आत आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेत आलेल्या सूचनांचा विचार आरक्षणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी करण्यात येईल. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची कोंडी

महापालिकेने विकास आराखडा बनविला त्याचवेळी हेरिटेज समिती, वास्तुविशारद संस्था व कोल्हापूरकरांनी या जागेवर दर्शन मंडप उभारण्यास विरोध केला आहे. मंदिर परिसरात ही एकमेव मोकळी जागा असल्याने नवरात्रौत्सवासह अन्यवेळी होणाऱ्या लाखोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाते. येथेच रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्निशमन यंत्रणा अशा आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा उभारल्या जातात. येथेच दर्शन मंडप उभारल्यास उलट परिसराची कोंडी होणार आहे.

हेरिटेज नियमांचे उल्लंघन

अंबाबाई मंदिराचा ‘अ’ वर्ग दर्जाच्या संरक्षित स्मारकात समावेश होता. त्यासंबंधीची प्राथमिक अधिसूचना पुरातत्त्व खात्याने काढली असून अंतिम अधिसूचना निघणे अद्याप बाकी आहे. मात्र ‘पुरातत्त्व’च्या नियमानुसारदेखील हेरिटेज वास्तूच्या परिसरात नव्या वास्तूची उभारणी करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे हेरिटेज समितीने या सुरुवातीपासूनच या प्रस्तावाला मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. येथे दर्शन मंडप उभारणे सर्वच दृष्टींनी चुकीचे असूनही तेथेच इमारत बांधण्याचा अट्टहास महापालिका का करीत आहे? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

फरासखाना, विद्यापीठ शाळेचा पर्याय

नव्याने दर्शन मंडप उभारण्याऐवजी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशेजारील फरासखाना व विद्यापीठ शाळेचा पर्याय समोर आला आहे. यापूर्वी विद्यापीठ शाळेने तपोवन येथे स्थलांतराची तयारी दाखविली होती. मात्र पुढे विषयच थांबला. फरासखान्याबाबतदेखील वास्तूचा मालकी हक्क असलेल्या व्यक्तींशी थेट चर्चा करून तोडगा काढण्यात सध्या पडून असलेली ही पुरातन वास्तू पुन्हा वापरात येणार आहे. या दोन्ही पर्यायांसाठी महापालिकेने पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
 

 

Web Title: Reservation on the premises of the University for the Darshan Tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.