रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, यादव गवळी समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:50 AM2019-06-28T11:50:54+5:302019-06-28T11:58:43+5:30
यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.
कोल्हापूर : यादव गवळी समाज शेती व पशुपालन करून उदरनिर्वाह करणारा असल्याने शासनाच्या अनेक सुविधा समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा समाज भटक्या-विमुक्त जमाती एन. टी. (बी)मध्ये समाविष्ट आहे. त्याला जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामधील ६१ वर्षांपूर्वीची रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचे निवेदन, यादव गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या यादव गवळी समाजाची आहे. समाजाला शैक्षणिक क्षेत्रातही सवलती मिळाव्यात. गवळी समाजाचा पूरक व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय आहे. यामध्ये त्यांंना मागासवर्गीयांप्रमाणे शासनाच्या सुविधा मिळाव्यात. प्रत्येक जिल्ह्यात दूध महासंघावर व वसंतराव नाईक विकास महामंडळावर गवळी समाजातील प्रतिनिधी नेमावा. कोल्हापूर शहरामध्ये वसतिगृहात सुविधा मिळावी.
यावेळी विश्वस्त युवराज गवळी, दिलीप गवळी, उदय डाकवे, दत्ताजीराव वाजे, प्राजक्ता राबाडे, नंदा गवळी, दगडू घोसाळकर, बाजीराव गावकर, कृष्णात महाडिक, चंद्रशेखर पोरे, अप्पा वरंडेकर, लीला धुमाळ, सत्यवान खेतले यांच्यासह गवळी समाज महासंघ, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई, कोल्हापूर शहर, भुदरगड, पन्हाळा, इचलकरंजी, शाहूवाडी, गगनबावडा व गवळी समाज युवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.