१८ प्रभागांत बदलले आरक्षण
By admin | Published: August 7, 2015 12:27 AM2015-08-07T00:27:39+5:302015-08-07T00:29:03+5:30
महापालिका निवडणूक : प्रत्येकी चार प्रभाग खुले व ओबीसी; तणावपूर्ण वातावरणात फेरसोडत प्रक्रिया
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी घेण्यात आलेल्या फेरसोडतीत अठरा प्रभागांच्या (२१ टक्के) अगोदरच्या आरक्षणात बदल झाले. ओबीसींसाठी आरक्षित असलेले चार प्रभाग खुले झाले व खुले असलेले चार प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित झाले. जे तीन प्रभाग खुले होते ते नव्या सोडतीत महिलांसाठी आरक्षित झाले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात व काहीशा तणावपूर्ण वातावरणातच ही सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून कक्ष अधिकारी अतुल जाधव उपस्थित होते.
या प्रक्रियेमुळे निवडणुकीतील महत्त्वाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेने परवाच्या ३१ जुलैला हीच आरक्षण सोडत पहिल्यांदा राबविली, परंतु ‘नागरिकांचा मागास प्रवर्गा’तील ‘आरक्षण निश्चित करताना जी पद्धत राज्य निवडणूक आयोगाने ३ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशान्वये निश्चित करून दिली होती तिचे पालन न केल्याने आयोगाने जाहीर केलेले आरक्षण रद्द केले व नव्याने ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. भाजपने आपल्याला सोयीचे आरक्षण झाले नसल्यानेच राजकीय दबाव वापरून ही प्रक्रिया नव्याने राबविली असल्याची टीका शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने केली होती. त्यावरून भाजप व शिवसेनेच्या नेत्यांतही खालच्या पातळीवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे आरक्षणाची फेरसोडतही संवेदनशील बनली होती. महापालिकेचे अधिकारीही कमालीचे तणावाखाली होते, परंतु सुमारे दोन तास ही प्रक्रिया सूत्रबद्धपणे व आयोगाच्या आदेशाचे पालन करून पूर्ण करण्यात आली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून आॅक्टोबरच्या अखेरीस मतदान होईल असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. यंदा नव्याने प्रभाग रचना केल्याने पूर्वीच्या ७७ प्रभागात चार नव्या प्रभागांची भर पडली. आता महापालिकेत दोन्ही काँग्रेसची सत्ता असून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाच्या वैशाली डकरे या महापौर आहेत. आता महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी संधान बांधले आहे. काँग्रेसचा सतेज पाटील गट स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष यांची आघाडी झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत फंदफितुरी मिटवून हा पक्षही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
लोकमत’चे वृत्त खरे ठरले
शहरातील महालक्ष्मी मंदिर (प्रभाग क्रमांक ३३) व मंगेशकरनगर (प्रभाग क्रमांक ४४) या दोन प्रभागामुळेच नव्याने आरक्षण घ्यावे लागले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ आॅगस्टला दिले होते. हे दोन्ही प्रभाग ३१ जुलैला टाकलेल्या आरक्षणामध्ये ‘सर्वसाधारण महिलां’साठी आरक्षित झाले होते, परंतु २००५ व २०१० च्या निवडणुकीत या प्रभागांत ‘नागरिकांचा मागास प्रवर्गा’चे आरक्षण कधीच पडलेले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत हे प्रभाग त्यासाठी आरक्षित व्हायला हवे होते; परंतु ते न झाल्याने असे का झाले म्हणून निवडणूक आयोगाने खोलात जावून चौकशी केली असता आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुरुवारी फेरसोडतीत महालक्ष्मी मंदिर ‘नागरिकांचा मागासवर्ग महिले’साठी तर मंगेशकरनगर हा प्रभाग ‘नागरिकांचा मागासवर्ग’ यासाठी आरक्षित झाला.
प्रभाग रचनेत बदल नाही
प्रभागांचे फेरआरक्षण काढल्याने प्रभाग रचनेतही काही बदल होईल का, अशी शंका नागरिकांच्या मनात आहे; परंतु या रचनेत तसा फारसा कोणताही बदल होणार नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. आरक्षण व प्रभाग रचना याबद्दल कुणाच्या हरकती असल्यास त्या मुख्य कार्यालय अथवा चार विभागीय कार्यालयांकडे १३ आॅगस्टपर्यंत घेता येतील, असे आयुक्तांनी जाहीर केले.