Kolhapur: शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत राहते घर जळून खाक
By विश्वास पाटील | Published: January 2, 2024 04:52 PM2024-01-02T16:52:13+5:302024-01-02T16:53:45+5:30
पहाटेपर्यंत आग विझवण्याचे सुरू होते काम
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील शामराव महादेव केसरकर यांच्या उंदरवाडी हद्दीत असलेल्या राहत्या घराला विजेच्या शाॅर्टसर्किटने आग लागून संसार साहित्यासह घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री दहाच्या सुमारास अचानक शाॅर्टसर्किट होवून घरात आग लागली. यावेळी घरात कोणी नव्हते. मात्र बाहेर गेलेले शामराव केसरकर परत आल्यानंतर त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. परंतु आगीचे रूप रौद्र असल्याने संपूर्ण घराला आगीने वेढले. त्यामुळे कोणाला काही करता येईना. बिद्री, हमीदवाडा साखर कारखाना व मुरगूड नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाले परंतु अगोदरच घरातील जळण, वैरण यासह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थ, युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. घटनास्थळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.