बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:25 PM2019-11-04T14:25:44+5:302019-11-04T14:27:40+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. संचालकांनी रविवारी आमदार विनय कोरे यांची भेट घेऊन नोकर भरतीसह राजीनाम्याबाबत चर्चा केली; पण नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राजीनाम्याबाबत विचार करू, असे कोरे यांनी सांगितल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
समितीचे सभापती बाबासो लाड व उपसभापती संगीता पाटील यांची मुदत एक महिन्यापूर्वीच संपली आहे. लाड व पाटील यांना दहा महिन्यांसाठी संधी देण्यात आली होती; पण विधानसभा निवडणूक असल्याने पदाधिकारी बदल लांबला. आता नव्याने बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून रविवारी सकाळी संचालकांनी आमदार कोरे यांची भेट घेतली.
संचालकांनी मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. लोकसभा निवडणूक असल्याने अर्ज मागवून प्रक्रिया स्थगित केली होती. विधानसभेच्या तोंडावर भरती करू नका, अशा सूचना आघाडीच्या नेत्यांनी दिल्या होता.
तोपर्यंत मागील संचालकांनी भरती केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे भरतीबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत संचालकांनी कोरे यांच्याकडे विचारणा केली. जुनी की नवीन घ्यायची, याबाबत आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करू, असे त्यांनी संचालकांना सांगितले.
सभापती, उपसभापतींच्या राजीनाम्याबाबत काही संचालकांनी आमदार कोरे यांच्याकडे विचारणा केली. नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राजीनाम्याचा विचार करू, आपण आमदार सतेज पाटील यांच्याशी बोलतो, असे कोरे यांनी सांगितले.