नेत्यांच्या दलबदलूपणाबद्दल जनतेत नाराजीचा सूर, कोल्हापूरकरांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:10 PM2024-02-13T18:10:36+5:302024-02-13T18:11:03+5:30

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केले होते अशी संतप्त विचारणा सोमवारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा ...

Resignation of leaders, displeasure among people over defection, Kolhapurkars expressed their anger | नेत्यांच्या दलबदलूपणाबद्दल जनतेत नाराजीचा सूर, कोल्हापूरकरांनी व्यक्त केला संताप

नेत्यांच्या दलबदलूपणाबद्दल जनतेत नाराजीचा सूर, कोल्हापूरकरांनी व्यक्त केला संताप

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केले होते अशी संतप्त विचारणा सोमवारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सामान्य जनतेतून उमटली. ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून होतीच. त्यांनी अजून भाजपला पाठिंबा दिला नसला तरी ही भाजपचीच खेळी असल्याच उघडच आहे. सामान्य जनतेतून या दलबदलूपणाबद्दल मात्र संताप व्यक्त झाला. अशा नेत्यांना आता जनतेनेच धडा शिकवला पाहिजे अशी सार्वत्रिक भावना लोकांतून व्यक्त झाली.

तत्वनिष्ठा केवळ भाषणापुरतीच 

केवळ सत्तेबाहेर राहायला लागतयं म्हणून जर अशोक चव्हाण यांच्यासारखी व्यक्ती रणांगणातून पळ काढत असेल तर मग तत्वनिष्ठा या गोष्टी भाषणापुरत्याच राहणार आहेत. खेदाची बाब म्हणजे विरोधी पक्षाची ताकद कमी होऊन विरोध मावळण्याची शक्यता आहे. ही बाब लोकशाहीला धोकादायकच म्हणावी लागेल. विरोधी पक्ष कमजोर झाल्यास सत्तारुढ पक्ष हुकूमशाहीकडे जाऊ शकतो. जनतेनेच आता पक्षबदलूंना धडा शिकवला पाहिजे. -के. के. माळी म्हाकवे (ता. कागल)

मतदारच चूक दुरुस्त करतील

चुकीच्या पक्षाकडे देश सोपवला, ही लोकांचीच चूक आहे. दहा वर्षे सत्ता भोगलेल्यांनाही पुन्हा निवडून येण्याची खात्री नाही म्हणूनच ते इतर पक्ष फोडत सुटले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता त्यांनी कॉग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. परंतु कायदा - कानून पाळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला हे रूजलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारच आपली चूक दुरुस्त करतील. - महादेव बिरंजे, गडहिंग्लज

राजकारण गढूळ झाले 

काँग्रेस पक्षाने सर्व पदे देऊनही नेते पक्ष सोडत आहेत. पक्ष अडचणीत असताना त्यांची ही कृती बरोबर नाही. भाजपच्या दबावामुळे काँगेस पक्षाला अडचणीचे दिवस आले आहेत. पन्नास - साठ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते पक्ष सोडत आहेत. पक्षातही सर्व काही आलबेल नाही असेच दिसते. सध्याच्या राजकारणाची कीव येते. कोणाचाच भरोसा नाही, असे राजकारण गढूळ झाले आहे. - बाबासो मुजावर, आळते (ता. हातकणंगले)

भीती दाखवून पक्षात घेतले जाते

जे पक्ष, नेते फुटायला लागलेत, त्यांच्या मागे समाजहित, राष्ट्रहित अजिबात नाही. राजकीय भान नाही. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने भरभरून दिले. मग त्यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला? भाजपमध्ये फक्त दहा टक्के लोक मूळचे भाजपचे आहेत. बाकी सर्व आयाराम आहेत. भाजपची खिचडी झाली आहे. भविष्यात भाजपला याचा दणका बसणार. देशात असे कधीच झाले नाही. भीती दाखवून पक्षात घेतले जात आहे. हे वातावरण गुन्हेगारीला पोषक आहे. -जोतिराम सूर्यवंशी पाटील मुरगूड (ता. कागल)

साम - दाम - दंडचा वापर घातक

महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राजकीय विचार घेऊन जाणारी राजकीय घराणी महाराष्ट्रात निर्माण झाली. पण, गेल्या चार वर्षांत अडचणीच्या काळातही रक्ताचे पाणी करून पक्ष उभारणी करण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या या विचारांना स्वार्थामुळे तिलांजली दिली. सत्ताधारी पक्षांनीही राजकीय विरोधक संपविण्यासाठी साम - दाम - दंड वापरण्याचे जे षडयंत्र सुरू केले आहे ते लोकशाहीला मारक आहे. - दिनेश सुभाष पाटील - कोपार्डे (ता. करवीर)

जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष
 
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय फुटाफुटीमुळे कोण कधी कोणत्या पक्षात जाईल, याचा नेम राहिलेला नाही. कोणी कोणती विचारसरणी स्वीकारावी, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे चुकीचे आहे, असेही नाही. पण, सध्याची देशपातळीवर होत असलेली राजकीय फुटाफूट सामान्य जनतेला गोंधळात टाकणारी आहे. जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. -अजित प्रभाकर माने बॅरिस्टर खर्डेकर चौक, कागल

पक्षनिष्ठा संपली 

स्वहितापलीकडे समाजहिताचा विचारच केला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मूल्यांचे राजकारण राहिलेले नाही. सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता असे दृष्टचक्र तयार झाले आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्षांची नेतेमंडळी अडकली आहेत. त्याचे पाप जनतेसमोर येऊ नये, याची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षात उड्या मारल्या जात आहेत. पक्ष, नेता यांच्याविषयीची निष्ठा संपली असून, याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. हे सर्वसामान्य जनतेपर्यंत जाईल त्यावेळी जनता विद्रोह करून बंड पुकारेल, तेव्हा सत्ताधारी पक्षाची अडचण होईल. -संपत देसाई पेरणोली (ता. आजरा)

लोकशाहीस धोक्याची घंटा

सध्याच्या पक्षांतराची पद्धती पाहता ही भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, वैचारिक मूल्ये आणि तत्त्वांना तिलांजली दिली जाते. ज्या हेतूने पक्षांतर बंदी कायदा केला, त्याचाही खून या तत्वशून्य राजकारण्यानी केला. लोकशाही टिकवण्यासाठी आता राजकारणबाह्य नागरिकांनी जागे होऊन मतदान करावे व भारतीय घटना कायदा आणि लोकशाही वाचवावी, याचीच गरज आहे. -प्रा. तानाजी स्वामी, लाटवडे (ता. हातकणंगले)

जनताच योग्य कौल देईल

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो हे खरं. पण सध्याचे राजकारण पाहता सामान्य माणसाची मती गुंठीत व्हावी, अशी स्थिती आहे. याचा निर्णय शेवटी निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. मनाचा आणि मताचा निकटचा संबंध आहे. पण, तो कल आज इकडे तिकडे हेलकावे खात आहे. व्यक्तीची, पक्षाची, विचारधारांची अस्तित्त्वाची लढाई प्रत्यक्ष निवडणुकांच्या निमित्ताने लोकांसमोर येते, त्यावेळी जनमतांचा कौल हाच अंतिम ठरतो. -अनिल बडदारे, राधानगरी

नेते गेले तरी पक्ष संपत नाही

महाराष्ट्राला छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. या राज्यात भाजप सदविचारांना तिलांजली देऊन फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. जनतेच्या मनात या पक्षाबद्दल प्रचंड रोष असून, येत्या निवडणुकीमध्ये त्याचा उद्रेक मतपेटीतून पाहायला मिळेल. बेरोजगारी, महागाई वाढत असताना भाजप फोडाफोडीचे राजकारण करून काहीही साध्य करू शकत नाही. नेते गेले म्हणजे कोणताही पक्ष संपत नाही. कारण पक्ष विचारांवर चालत असतो, नेत्यांवर नव्हे.- सम्राट मोरे, गारगोटी (ता. भुदरगड)

मतलबी राजकारण 

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप अनुभवायला मिळत आहेत. सध्या राज्यात दबावशाही आणि मतलबीपणाचे राजकारण सुरू आहे. फुटीच्या राजकारणाने लोकांचा राजकीय नेतृत्त्वावरील विश्वास कमी होत आहे. एका पक्षातून निवडून यायचे आणि त्या पक्षाला वेशीला टांगून सत्तेसाठी त्याच पक्षाला रामराम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. पळून जाणाऱ्या नेत्यांना निवडून दिलेल्या जनतेचा विसर पडला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठीच हा खटाटोप आहे. या किसळसवाण्या राजकारणाचा जनतेला वीट आला आहे. -निवास शिंदे आसुर्ले, (ता. पन्हाळा)

बिहारसारखे राजकारण महाराष्ट्रात 

या फुटीच्या राजकारणाला सत्ताकारण हा बेस आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने असले राजकारण कधीही बघितले नव्हते. याचे परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर आणि तरुण पिढीवर होणार आहेत. बिहारसारखे राजकारण महाराष्ट्रात सुरू झाले आहे. सामान्य जनतेनेच या प्रवृत्तीला आता ठेचण्याची वेळ आली आहे. - महादेव शंकर माने, शिरोळ

सत्तेकडे नेते आकर्षित 

पदासाठी, सत्तेसाठी नेते तडजोड करत आहेत. प्रामाणिक लोकांचे राजकारण संपले आहे. त्यामुळे ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाकडे नेतेमंडळी जात आहेत. विचारसरणीचे राजकारण संपले आहे. सत्तेकडे नेतेमंडळी आकर्षित होत आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्याचे काम जनताच करेल. - उदयसिंग कोकरे-देसाई मलकापूर (ता. शाहूवाडी)

Web Title: Resignation of leaders, displeasure among people over defection, Kolhapurkars expressed their anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.