दारू दुकान स्थलांतरास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 12:45 AM2017-05-13T00:45:51+5:302017-05-13T00:45:51+5:30
दारू दुकान स्थलांतरास विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेले शहरातील मुख्य मार्गावरील दारू दुकान येथील काळभैरी रस्त्यावर स्थलांतरित करण्यास परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढून विरोध केला. नागरिकांचा विरोध डावलून स्थलांतरास परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गडहिंग्लज शहरातील सात दारू दुकानदारांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. त्यापैकी एक दुकान येथील काळभैरी मार्गावर स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगुद्री कॉलनी व गडहिंग्लज हायस्कूल परिसरातील महिला व नागरिकांनी नगरपालिका व राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी दारूबंदीच्या जोरदार घोषणा दिल्या.
नगरपालिकेत उपनगराध्यक्ष नितीन देसाई, तर उत्पादन शुल्क कार्यालयात गडहिंग्लज तालुका निरीक्षक पी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले. काळभैरी मार्गावर शाळा-महाविद्यालये आणि धार्मिकस्थळे असून महिला व नागरिकांना मद्यपींचा त्रास होणार असल्यामुळे याठिकाणी दारू दुकान सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मोर्चात नगरपालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शशिकला पाटील, नगरसेविका रेश्मा कांबळे, नगरसेवक दीपक कुराडे, कॉ. उज्वला दळवी, अलका भोईटे, अरुणा श्ािंदे, उर्मिला कदम, समन सावंत, शारदा अजळकर, सुवर्णा बेळगुद्री, अण्णासाहेब बेळगुद्री, डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्रा. आशपाक मकानदार, दयानंद पाटील, अजित बेळगुद्री, आदींसह नागरिक सहभागी झाले होते.