विभागात २३ लाख वृक्षलागवडीचा संकल्प
By admin | Published: June 28, 2016 12:26 AM2016-06-28T00:26:06+5:302016-06-28T01:15:47+5:30
शुक्रवारी लोकचळवळ : ४३९८ गावांतील १० लाख लोक सहभागी होणार, एम. के. राव यांची माहिती
कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागात शुक्रवारी (दि. १) २३ लाख २५ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एम. के. राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या लोकचळवळीत ४३९८ गावांतील सुमारे १० लाख लोक सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वनक्षेत्र व वृक्षाच्छादन २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने वन विभागाने ‘हरित महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी १ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सवाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्णांसाठी ११ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले असले तरी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या पाठबळावर २३ लाखांपर्यंत वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून ११ हजार २५२ ठिकाणी वनविभाग, सामाजिक वनीकरण व इतर संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधींच्या हस्ते लागवड केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठात सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘सुतार विहीर’ परिसरात हरित महाराष्ट्र कार्यक्रमास कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे.
पाचही जिल्ह्णांत हा कार्यक्रम राबविला जाणार असून यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एम. के. राव यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, दादा शेंडगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हजार झाडांमागे एक कुटुंब
केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी एक हजार झाडांमागे एक कुटुंबाची नेमणूक केली जाणार असून पाच वर्षांचा करार केला जाणार आहे. यासाठी संबंधित कुटुंबाला सरकार पैसे देणार आहे. त्याचबरोबर शाळांत ‘वृक्ष दत्तक’ योजना राबविणार असल्याचे राव यांनी सागिंतले.
‘बिग बी’ची भेट
वृक्षारोपण करताना नागरिकांनी ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेमध्ये आपले फोटोग्राफ्स पाठवावेत. १ जुलै रोजी सकाळी ६ ते ३ जुलैच्या रात्री बारापर्यंत फोटो पाठवावेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेते काढले जाणार असून विजेत्यांना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मेळघाट, ताडोबा येथील अभयारण्यांना मोफत भेटी देता येणार आहेत.