भाजपकडून कर्जमाफी मागणीचा ठराव

By admin | Published: April 12, 2017 01:01 AM2017-04-12T01:01:44+5:302017-04-12T01:01:44+5:30

मिरज पंचायत समिती सभा : रखडलेल्या पाणी योजनांबाबत सदस्य आक्रमक

The resolution of the debt waiver from the BJP | भाजपकडून कर्जमाफी मागणीचा ठराव

भाजपकडून कर्जमाफी मागणीचा ठराव

Next



मिरज : भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभेत मंगळवारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पंचायत समितीच्या मासिक सभेत काँग्रेस व राष्ट्रवादीने ठराव मांडला. सभेत नवनिर्वाचित सदस्य पिण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक झाले. रखडलेल्या पाणी योजनांना जबाबदार असणाऱ्या ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
मिरज पंचायत समितीची पहिली मासिक सभा सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे व सहाय्यक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभापती जनाबाई पाटील यांच्यासह महिला सदस्या फेटे बांधून सभागृहात आल्या.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीने कर्जमाफीची मागणी करीत भाजप सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांच्या कर्जमाफीच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.
काँग्रेस सदस्य अनिल आमटवणे यांनी कर्जमाफीचा ठराव मांडला. राष्ट्रवादीचे सदस्य अशोक मोहिते व अजयसिंह चव्हाण यांनी या ठरावाला समर्थन दिले. सभागृहात ठराव होत असताना भाजपच्या एकाही सदस्याने या विषयावर विरोध न करता कर्जमाफीचा ठराव मंजूर केला.
तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही पाणीपश्न निर्माण होण्याचे कारण काय? असा जाब अनिल आमटवणे, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे यांनी विचारला.
सभेत पाणी योजनांच्या वस्तुस्थितीची माहितीही अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर, तीन योजना रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये नरवाड पाणी योजनेचा समावेश होता. या योजनेवर निधी खर्च होऊनही गेली आठ ते नऊ वर्षे ती रखडली असल्याचे आमटवणे यांनी निदर्शनास आणून दिले. कृष्णदेव कांबळे यांनी, भोसे व सिध्देवाडी योजनेचा व किरण बंडगर यांनी टाकळी बोलवाड योजनेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अपूर्ण पाणी योजनांना कारणीभूत असलेल्या ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमटवणे यांनी केली.
उपसभापती काकासाहेब धामणे यांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसह इतर विषयावर सभेत चर्चा करण्यात आली. रंगराव जाधव, छाया हत्तीकर, विक्रम पाटील यांच्यासह सदस्य चर्चेत सहभागी होते. (वार्ताहर)

Web Title: The resolution of the debt waiver from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.