‘ज्ञानगंगा घरोघरी’चा संकल्प अपूर्णच
By admin | Published: March 29, 2015 11:28 PM2015-03-29T23:28:07+5:302015-03-30T00:15:54+5:30
माणिकराव साळुंखे यांची खंत : ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार
सांगली : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असून, ते पूर्ण करण्यास आम्ही कमी पडलो आहोत. भविष्यात सामान्यांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
डॉ. साळुंखे म्हणाले, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी लोकविद्यापीठाची संकल्पना मांडली होती. त्यांचेच कार्य मुक्त विद्यापीठ पुढे नेत आहे. सध्या महाराष्ट्रातील सात लाख विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिकणारे सर्वजण नोकरी-व्यवसाय सांभाळून शिक्षण घेतात. मागील वर्षी २८० विद्यार्थ्यांनी बी. एस्सी. ची पदवी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकऱ्या लागल्या आहेत. कौशल्य विकासाला भविष्यकाळात अत्यंत महत्त्व येणार आहे. साहजिकच विद्यापीठाच्या माध्यमातून ‘स्किल डेव्हलपमेंट’ या विषयाकडे लक्ष देण्यात येणार आहे. आजकाल इतर विद्यापीठातून जे शिक्षण मिळते त्यामुळे केवळ पदव्या प्राप्त होतात. परंतु त्यातील बहुतांश ज्ञानाचा जीवनात वावरताना काहीही उपयोग होत नाही. शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्यातील असले पाहिजे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करुन दिली आहेत. त्याचा लाभ आज असंख्य विद्यार्थी घेत आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे मुक्त विद्यापीठाला नेमलेल्या पुस्तकांचा अभ्यास करीत आहेत. (प्रतिनिधी)
भविष्यात मोबाईलवरुन शिक्षण देणार
प्रत्येकाकडे मोबाईल हमखास असतो. त्यामुळे भविष्यात मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा नवीन प्रयोग करण्याचा मुक्त विद्यापीठाचा विचार आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात संबंधित विषयांची पुस्तके घरपोच करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन तीन अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव भिन्न आहे. मुक्त विद्यापीठात नवनवीन उपक्रम राबविण्यास मोकळीक आहे, मात्र ते स्वातंत्र्य इतर विद्यापीठात नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.