शिरगाव ग्रामसभेत डॉल्बी न लावण्याचा ठराव
By admin | Published: August 17, 2016 12:28 AM2016-08-17T00:28:54+5:302016-08-17T00:29:20+5:30
\लोकमत इनोशिटिव्ह
शिरगाव : शिरगाव (ता. राधानगरी) येथील ग्रामसभेत डॉल्बी न लावण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. या ठरावावेळी ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातमीचा उल्लेख करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजयसिंह गोविंदराव कलिकते होते. सभेसाठी तरुणांची मोठी गर्दी होती.
मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकल्याने शासकीय प्रतिनिधी म्हणून विद्यामंदिर शिरगावचे मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी काम पाहिले. अहवाल वाचन लिपिक सुरेश गौंड यांनी केले. सभेत गावच्या विकासावर अनेकांनी सूचना मांडल्या. सरपंच कलिकते यांनी या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.
वैयक्तिक शौचालयासाठीची नावे, अपंग व्यक्तींना मदत, जमाखर्च, ताळेबंद, नळांना थेट पाणीपुरवठा, सार्वजनिक मुतारी, शौचालय, एका गल्लीतील विद्युत पोल, शासकीय योजनांच्या पाठपुरावा होत नसणे, तसेच क्रीडांगणाबाबत चर्चा झाली.
यावेळी बाबूराव पाटील, सुनील चौगले, कृष्णात पाटील, अमर पाटील, राहुल चौगले, सुशांत पाटील, अजित पाटील, राजेंद्र व्हरकट, सुभाष नाईक, मानसिंग पाटील, मधुकर किरुळकर, माजी सरपंच डॉ. बाळासाहेब पोवार, सुरेश कलिकते, पी. ए. पाटील, धनाजीराव चरापले, बाबूराव चरापले, दिनकर चरापले, हणमंत चौगुले, नामदेव जाधव, बी. एस. पाटील, भीमराव चरापले, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना कलिकते यांनी उत्तरे दिली. महिन्याभरात पेयजल योजनेचे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तंटामुक्त अध्यक्षांच्या फेरनिवडीबाबत इच्छुकांच्या जास्त संख्येमुळे त्यांना कमिटीत घेऊन जुन्यानीच कारभार पाहण्याचे ठरले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. पोलिस पाटील संजय कांबळे यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)