यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:04 PM2019-08-20T18:04:55+5:302019-08-20T18:06:00+5:30
अनपेक्षित व दुर्दैवी अशा पूर परिस्थितीमुळे कोल्हापूरसह सांगलीवासीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. यात आपले बांधव अडचणीत असताना यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला पाहिजे. कमीत कमी खर्च करून उर्वरित निधी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जावा, असा निर्णय मंगळवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या राजारामपुरीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर : अनपेक्षित व दुर्दैवी अशा पूर परिस्थितीमुळे कोल्हापूरसह सांगलीवासीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. यात आपले बांधव अडचणीत असताना यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला पाहिजे. कमीत कमी खर्च करून उर्वरित निधी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जावा, असा निर्णय मंगळवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या राजारामपुरीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
राजारामपुरी परिसरात गेले कित्येक वर्षांपासून विद्युत रोषणाई ते सजीव देखावे, असा भव्यदिव्य गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह अनेक मंडळांच्या आरास व काल्पनिक मंदिरे यामुळे या परिसराची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात आहे; त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक गणेशोत्सव काळात या ठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात.
यंदा कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांत महापूर आल्याने आपले सर्व बांधव अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणे उचित ठरणार नाही. विद्युत रोषणाई, देखावे यांवर खर्च केले जाणारे लाखो रुपये पूरग्रस्तांच्या मदतीला आले तर त्यांचे संसार पुन्हा उभारतील. या दृष्टीने राजारामपुरीतील १२९ मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शुक्रवारी (दि. २३) ला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात ठोस निर्णय जाहीर केला जाणार आहे. या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय जाधव (काका), कमलाकर जगदाळे, अनुप पाटील, संजय काटकर, बाबा इंदुलकर, राजू लिंग्रस, माजी नगरसेवक अनिल कदम, सुरेश डोणुक्षे, शेखर घोटणे, काका पाटील, लॉरी आॅपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, अमर हर्षे, मदन जाधव, किशोर खानविलकर, मयूर भोसले, अभिजित शिंदे, शैलेश जाधव, धैर्यशील साळोखे, ओंकार घाटगे, आदिनाथ चौगुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.