विरोधकांना पुन्हा चितपट करू: धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:08 AM2018-10-03T00:08:57+5:302018-10-03T00:09:02+5:30
कोल्हापूर : विरोधकांना ऊठसूट महाडिक कुटुंबीय दिसत असून, त्यांनी टीका करण्यापूर्वी आमची विकासकामे बघावीत. गेल्या निवडणुकीत जनतेनेच ‘दक्षिण’ मधून विरोधकांना हद्दपार केले. आगामी निवडणुकीतही त्यांना पुन्हा चितपट करू, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ज्ञानेश्वरी विकास व आनंद दूध संस्था सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. महाडिक म्हणाले, आम्ही द्वेषापेक्षा विकासाचे राजकारण केल्यानेच जनतेने आम्हाला मोठे केले. जिल्ह्यातील जनता आमच्या मागे असल्याने कोणी, कितीही वल्गना केल्या तरी काही फरक पडत नाही. कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गास मंजुरीसह अनेक कामे आपण पूर्णत्वास नेली. आतापर्यंत कामांमुळेच देशात ‘नंबर वन’चा खासदार झालो. ‘आनंद’ दूध व ज्ञानेश्वरी विकास संस्थेचे सर्जेराव पाटील यांनी महिलांचा पैठणी देऊन सन्मान करून आदर्शवत काम केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘ज्ञानेश्वरी’चे संस्थापक-अध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांनी समाजाभिमुख कामे केल्यानेच त्यांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविले. अशा कर्तृत्ववान खासदारांच्या मागे कोल्हापूरची जनता ठाम राहील. राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, उपसरपंच तानाजी पाटील, सुदर्शन पाटील, तानाजी यशवंत, उत्तम झांबरे, दाजी झांबरे, पांडुरंग कांबळे, जितेंद्र यशवंत, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, सभासद उपस्थित होते. गीतेश डकरे यांनी स्वागत केले. महादेव लोकरे यांनी आभार मानले.
बिनखर्चाची राज्यातील पहिली संस्था
‘ज्ञानेश्वरी’ संस्थेत स्थापनेपासून खर्चाचे व्हाऊचरही नावे टाकलेले नाही. बिनखर्चाचा कारभार करणारी राज्यात ही एकमेव संस्था असून, सर्जेराव पाटील यांनी सहकारासमोर आदर्श ठेवल्याचे गौरवोद्गार महाडिक यांनी काढले.