आरक्षणावरून गदारोळ
By admin | Published: November 8, 2015 12:12 AM2015-11-08T00:12:23+5:302015-11-08T00:16:25+5:30
महापालिका सभा : शेटे यांचा सहायक संचालकांवर सुपारीचा आरोप
कोल्हापूर : शहरातील मोक्याच्या जागांवर असणारी बगीचा व प्राथमिक शाळेची आरक्षणे उठविण्यासाठी नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी सुपारी घेतल्याचा खळबळजनक आरोप भूपाल शेटे यांनी शनिवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत केला. कागदपत्रे अपूर्ण असताना, जागेचा मालक कोण हे सिद्ध झाले नसताना आणि जागा खरेदीची आर्थिक कुवत नसताना ती जागा महानगरपालिका का आणि कोणाच्या फायद्यासाठी खरेदी करीत आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.
प्राथमिक शाळा व बगीच्यासाठी आरक्षित असलेल्या जागा खरेदीचा प्रस्ताव आणि ई वॉर्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनवरून महासभेत अधिकाऱ्यांवर चौफेर हल्लाबोल करण्यात आला. आरक्षित जागा खरेदी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यापूर्वी संबंधित जागामालकाचे खरेदीपत्र का मागून घेण्यात आले नाही, याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी खरेदीपत्राची प्रत सादर केली जाईल, असे सांगितले; परंतु सभेचे कामकाज संपले तरीही त्या खरेदीपत्राची प्रत आली नाही. त्यामुळे जोपर्यंत मूळ खरेदीपत्र मिळत नाही, तोपर्यंत प्रस्तावाला मंजुरी देणार नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. शहरातील ई वॉर्ड रि. स. नंबर ८५/२ब पैकी व ८६/२ पैकी ३०८० चौरस मीटर क्षेत्र बगीच्यासाठी आरक्षित आहे, तर रि. स. नंबर ९०५/१ पैकी ३४३३.६७ चौरस मीटर क्षेत्र महापालिका प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. या जागा खरेदी करण्याबाबत मालकांनी महापालिकेला परचेस नोटीस पाठविली आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव नगररचना विभागाने महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. गेल्या तीन सभांमध्ये या विषयावर चर्चा होऊन मूळ मालकाच्या खरेदीपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करा, मगच प्रस्ताव मंजूर करू, अशी भूमिका सदस्यांनी घेतली आहे. शनिवारीही अपूर्ण कागदपत्रांचाच प्रस्ताव महासभेसमोर आणल्यामुळे सदस्य संतप्त झाले. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तरीही एका जागेच्या मोबदल्यात ३ कोटी ९८ लाख आणि ४२ लाख ७२ हजार व्याज; तसेच दुसऱ्या जागेस ५ कोटी ७९ लाख आणि व्याज ६२ लाख ०७ हजार रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत. जागा खरेदी करताना रीतसर करा, मूळ मालकांकडून खरेदीपत्राची कागदपत्रे घ्या, पॉवर आॅफ अॅटर्नीची कागदपत्रे घ्या, अशी मागणी असताना त्यासाठी टाळाटाळ का करण्यात येते, असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला.
कदमांच्या जागेवरून अधिकाऱ्यांना घेरले
ई वॉर्ड, बापट कॅम्प परिसरात उभारण्यात येणारे सांडपाणी उपसा केंद्र व त्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शेती व ना-विकास क्षेत्रातून जागा वगळण्याचा विषयही सभागृहात चांगलाच गाजला. जेवढी जागा पाहिजे आहे, तेवढ्याच जागेचे क्षेत्र वगळा, अशी आग्रही मागणी राजेश लाटकर यांनी केली. जी व्यक्ती फुकट जागा देत आहे, त्याची जागा न घेता दुसऱ्याच व्यक्तीची जागा घेऊन त्या संपूर्ण परिसरातील झोन बदलण्याचा उद्योग कोणाच्या फायद्यासाठी करीत आहात, अशी विचारणा लाटकर यांनी केली.