विरोधकांना जशास तसे उत्तर द्या
By Admin | Updated: July 20, 2014 22:16 IST2014-07-20T22:08:44+5:302014-07-20T22:16:09+5:30
नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आदेश : कणकवलीतील स्नेहमेळाव्यात प्रतिपादन

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या
कणकवली : जर कोणी तुमच्यावर हात उगारत असेल तर त्याचे हात खांद्यापासून वेगळे करा. त्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. कार्यकर्ता शूर असला पाहिजे. न सांगता कराल तर कौतुकही होईल आणि सत्कारही. विरोधकांना जशासतसे उत्तर द्या. अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
साधा सरपंचदेखील राजीनामा देत नाही. मात्र, मंत्रीपदाचा राजीनामा मी देत आहे. माझा संघर्ष करणाऱ्यांचा पिंड आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनीअरिंग कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता स्नेहमेळाव्यात नारायण राणे बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष संदेश सावंत, सेवादलचे अध्यक्ष वसंत केसरकर, शाहू सावंत, संदीप कुडतरकर, संजय पडते, विकास सावंत, दत्ता सामंत, अशोक सावंत, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, अंकुश जाधव, जयेंद्र रावराणे, संदीप कदम, अशोक तोडणकर, बाळू कोळंबकर, अस्मिता बांदेकर, श्रावणी नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हे एक मंदिर असून येथील नागरिक माझ्यासाठी देवतेप्रमाणे आहेत. त्यांना नमस्कार करण्यासाठी गेले दोन दिवस जिल्हा दौरा केला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी जे पाऊल टाकेन त्यामध्ये निश्चितच यश मिळेल असा विश्वास आता निर्माण झाला आहे.
खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना राणे म्हणाले, कोकणच्या विकासासाठी आपण काय केले हे प्रथम जाहीर करावे. राऊत यांची माझ्यावर टीका करण्याची लायकी नाही. आमचे सरपंच तरी कामात तसेच दिसायलातरी स्मार्ट असतात. मात्र तेवढेही राऊत नाहीत. सोमवारी मी जो निर्णय घेईन त्यावेळी जे घडेल ते तुम्ही पहालच.
दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, केसरकर गोव्यात राहतात मग ते सिंधुदुर्ग कसा दहशतवादमुक्त करणार? सावंतवाडी शहराबाहेर ते नेते आहेत हे कोणालाही माहिती नाही. त्यांचे काय कार्य आहे ते प्रथम त्यांनी जाहीर करावे. नंतरच माझ्यावर टीका करावी.
शिवसेनेचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे एवढेच त्यांना समजते. ते म्हणाले गेल्या २५ वर्षात येथील विकासाचा कळस मी उभारला. मात्र त्याला सुरुंग कोणी लावला? हे माहित नाही. यापुढे मी जी वाटचाल करेन ती कोकणाबरोबरच महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल. त्यामुळे तुम्ही फक्त साथ द्या, असे भावनिक आवाहनही नारायण राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. (वार्ताहर)
---माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आज समर्थन आणि पाठिंबा द्यायला कणकवलीत आले आहेत. या सर्वांचे प्रेम मी जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीसुद्धा हे प्रेम असेच वृद्धींगत राहण्यासाठी कार्यरत रहा. प्रेमाचा झरा कधीही आटू देवू नका. नुसते देखल्या देवा दंडवत नको, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.
राजन तेली, काका कुडाळकरांची अनुपस्थिती
--- कणकवली येथे आज झालेल्या स्नेहसंमेलनासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, प्रवक्ते काका कुडाळकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजन तेली उपस्थित नव्हते. नारायण राणे गेले दोन दिवस सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना हे दोन्ही पदाधिकारी त्यांच्या दौऱ्यात कुठेही सहभागी नव्हते आणि स्नेहसंमेलनासही उपस्थित नव्हते.
काँग्रेस जिवंत ठेवण्याची ताकद : प्रवीण भोसले
----प्रविण भोसले म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल अपेक्षित असतील तर काँग्रेसने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. काँग्रेस जिवंत ठेवण्याची ताकद राणे यांच्यात आहे.
स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्र आतुर : सिद्धार्थ बनसोडे
-----खास अमरावती येथून आलेले सिद्धार्थ बनसोडे म्हणाले, या स्नेहमेळाव्यासारखे मेळावे आयोजित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राणे यांची वाट पहात आहे. राणे यांनी कुठलाही निर्णय घ्यावा आणि आम्हाला आदेश द्यावेत. त्याप्रमाणे आम्ही काम करु.
दीपक केसरकरांनी राणेंचे पाय धरले होते : कुडतरकर
संदीप कुडतरकर म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण सिंधुदुर्गच्या सुपुत्राने ढवळून टाकले आहे. नारायण राणे यांच्यासारखा नेता आपण पाहिला नाही. त्यांच्यामुळेच काँग्रेसमध्ये आम्हाला प्रतिष्ठा मिळाली. आमदार होता यावे यासाठी मागील निवडणुकीत दीपक केसरकर यांनी राणेंचे पाय धरले होते. मात्र, आता ते हे विसरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी नारायण राणे यांच्या पाठिशी राहूया.
नारायण राणेंवर झाला अन्याय : जयेंद्र परूळेकर
डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, सध्या राजकारणात मंथन सुरु झाले आहे. हे मंथन घडविणारे राणे आहेत. पूर्वी कोकणाला मागासलेले म्हटले जायचे. परंतु राणे यांच्यामुळे येथील विकास झाला आहे. ९ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांना दिली गेलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याच्या पाठिशी आपण ठाम राहिले पाहिजे.
काँग्रेसने संधी देणे आवश्यक : विकास सावंत
विकास सावंत म्हणाले, नारायण राणे यांना काँग्रेसने योग्य संधी दिली नाही. आतापर्यंत राणे यांनी लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र, त्यांच्यावर अन्याय होत राहिला आहे. राणेंसारख्या खंबीर नेत्याच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे.
राणेंनी लढवय्याप्रमाणे लढत रहावे : वसंत केसरकर
वसंत केसरकर म्हणाले, गेल्या ९ वर्षात राणेंना काँग्रेसने न्याय दिला नाही. राजकारणाचे व्यापारीकरण करणारे कार्यकर्ते आता मागे पडले असून कष्ट करणारा कार्यकर्ता पुढे आला आहे. हे सर्व कार्यकर्ते राणे यांच्या निश्चितपणे पाठिशी राहतील. त्यांनी लढवय्यासारखे लढत रहावे.