कोल्हापूर : बाबूजींच्या स्वरांनी गहिवरले रसिक, ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणीं’ना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:31 AM2018-08-18T11:31:33+5:302018-08-18T11:35:46+5:30
‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते.
कोल्हापूर : ‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते.
सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील देवल क्लब, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि स्वानंदी, पुणे यांच्यातर्फे ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
पुणे येथे १९८६ मध्ये बाबूजींचा खुल्या मैदानात हा कार्यक्रम झाला होता. गायक, वादक आणि निवेदक अशा तीनही भूमिकांमध्ये होते बाबूजी. यावेळी चित्रित केलेला हा कार्यक्रम देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात दाखविण्यात आला. आनंद आणि कुंदा देशमुख यांनी या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले होते. बाबूजी कोल्हापूरचे; त्यामुळे हा कार्यक्रम पहिल्यांदा कोल्हापुरात दाखवायचा, या देशमुख यांच्या आग्रहामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट काढण्यासाठी लागणारा पैसा बाबूजी जाहीर कार्यक्रमांतून गोळा करायचे; पण अशा एका कार्यक्रमावेळी घसा बसल्यामुळे त्यांना गाणे शक्य नव्हते. यावेळी पंडित भीमसेन जोशी यांनी यासाठी गायन केले. मात्र रसिकांची माफी मागून बाबूजींनी हाच कार्यक्रम पुन्हा सादर केला. त्याचेच हे चित्रीकरण करण्यात आले होते.
सुधीर फडके यांनी गाजलेली भावगीते, भक्तिगीते, लावणी या सगळ्यांचा आस्वाद यावेळी रसिकांनी घेतला. याप्रसंगी देवल क्बलचे श्रीकांत डिग्रजकर, दिलीप गुणे, अरुण डोंगरे, फिल्म सोसायटीचे चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, आनंद देशमुख, राजेंद्र आवटे, स्वानंदी पुण्याचे मकरंद केळकर, आदी उपस्थित होते. सुरुवातीला सुधीर फडके यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.