कोल्हापूर येथे कृषी प्रदर्शनास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:54 AM2017-11-04T00:54:46+5:302017-11-04T00:56:16+5:30
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ व राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ शुक्रवारी गांधी मैदान येथे झाला. येथे आॅटोमोबाईल, औषधांसह खाद्यपदार्थांचे सुमारे २०० स्टॉल उभारले असून उद्या, रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
खाद्यपदार्थ, कृषिसाहित्य, आॅटोमोबाईल, शेती अवजारे, विविध कीटक व तणनाशक व बचतगटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलचा सहभाग असलेले हे कृषी प्रदर्शन शुक्रवारी सर्वांसाठी खुले झाले. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी याचे उद्घाटन करण्यात आले.
प्रदर्शनात शुक्रवारी पहिल्या दिवशी कागल तालुक्यातील भल्या मोठ्या शिंगांचा बोकड व पाच किलो वजनाचा कोंबडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पहिल्या दिवशी जनावरे, पशुपक्ष्यांची संख्या कमी असली तरी आज, शनिवारपासून नामवंत जनावरे व आकर्षक पशुपक्ष्यांचे स्टॉल वाढणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
रविवारी दुपारी चार वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ व बक्षीस वितरण होणार आहे. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक विलास साठे, जी. डी. पाटील, परीक्षित पन्हाळकर, आदी उपस्थित होते.
गांधी मैदानात पहिलेच कृषी प्रदर्शन
गांधी मैदानात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना या प्रदर्शनाबाबत कमालीचे कुतूहल आहे. उद्घाटनापूर्वी नागरिकांनी स्टॉल पाहण्यासाठी गर्दी केली होती.
कोल्हापुरातील गांधी मैदान येथे शेतकरी संघ व राजारामबापू दूध संघ यांच्या वतीने शुक्रवारपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षित पन्हाळकर, राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, युवराज पाटील, महापौर हसिना फरास, के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.