ब्रेल लेखन-वाचन स्पर्धेला प्रतिसाद, सक्षम संस्थेतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 04:00 PM2020-01-08T16:00:31+5:302020-01-08T16:06:58+5:30
ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापुरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ब्रेल लेखन-वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अंधबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर : ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेच्या कोल्हापुरातील शाखेमार्फत येथील नूतन मराठी विद्यालयामध्ये ब्रेल लेखन-वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अंधबांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल लिपीची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये, यासाठी सक्षम संस्थेमार्फत ही ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेण्यात आली.
प्रारंभी लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सक्षम संस्थेचे तुषार डोंगरे, विवेक मोरे, भक्ती करकरे, डॉ. चेतन खारकांडे, अंध शाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे, संजय पवार, विनायक पाटिल आदी उपस्थित होते. सक्षमच्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांनी नियोजन केले.
ब्रेल लेखन-वाचन स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या ‘थैलीभर गोष्टी’ आणि हेल्पर्स संस्थेच्या नसीमा हुरजूक यांच्या ‘चाकाची खुर्ची’ हे ब्रेल लिपीतील पुस्तक निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी या पुस्तकातील निवडक गोष्टींचे उतारे निवडण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी अशा दोन गटांत पार पडली.कोल्हापुरातील विकास हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, अंध शाळा अशा विविध ५२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.
आनंद आणि आत्मविश्वास
ब्रेल वाचन आणि लेखन या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी परीक्षकांनी वाचनाला सुरुवात केली आणि लेखन सुरू झाले. पाहता पाहता त्यांच्या स्लेटवर कलमांचे सुमधुर आणि वळणदार ठोके ऐकू येऊ लागले. जसजसे लेखन पूर्ण होऊ लागले, तसतसे त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाच्या संमिश्र भावना उमटू लागल्या. त्यानंतर वाचन स्पर्धा सुरू झाली आणि ब्रेल पुस्तकावरील ठिपक्यांवरून त्या विद्यार्थ्यांची बोटे सहजरीत्या फिरू लागली. वाचन करताना त्यांच्या चेहऱ्यावरही पुस्तकातील त्या शब्दांचेही भाव दिसू लागले. स्पर्धा पूर्ण होताच, आत्मीयतेने स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल या स्पर्धकांनी एकमेकांचे हस्तांदोलन केले.