संजीव संकपाळ, अतुल डाके यांच्या चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनाला बुसानमध्ये प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:54 PM2019-12-07T15:54:27+5:302019-12-07T15:56:40+5:30
दक्षिण कोरिया येथील बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये भरविण्यात आलेल्या चित्र-शिल्प महोत्सवातील प्रदर्शनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार संजीव संकपाळ आणि शिल्पकार अतुल डाके यांच्या कलाकृतींना दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर : दक्षिण कोरिया येथील बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये भरविण्यात आलेल्या चित्र-शिल्प महोत्सवातील प्रदर्शनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार संजीव संकपाळ आणि शिल्पकार अतुल डाके यांच्या कलाकृतींना दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्ये जगभरातील कलावंतांचा सहभाग आहे. या महोत्सवातील प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकार आणि शिल्पकार संजीव संकपाळ तसेच अतुल डाके यांना निमंत्रण देण्यात आले आहे. हे दोन्ही कलावंत सध्या बुसानमध्ये असून, त्यांच्या कलाकृतींना प्रतिसाद मिळत आहे. संजीव संकपाळ यांची चित्रे आणि अतुल डाके यांच्या शिल्पाकृतींचा या प्रदर्शनात समावेश आहे.
या महोत्सवातील प्रदर्शनात कोल्हापुरातील या दोन कलावंतांच्या चित्रांचा आणि शिल्पांचा समावेश आहे. या महोत्सवात हे दोन्ही कलावंत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हापूरच्या कलापरंपरेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात या दोन्ही कलावंतांचे योगदान महत्त्वाचे आहे. या प्रयत्नाला कोल्हापुरातील कलाकारांच्या वर्तुळात या दोन्ही कलावंतांचे अभिनंदन होत आहे.
उद्घाटनाला हजारो रसिकांची उपस्थिती
बुसानमध्ये झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला हजारो रसिकांनी उपस्थिती दर्शविली. आंगुक झेन सेंटरचे सेबुल सेईनम, टीव्हीएस मोटार कंपनी, कोरियाचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांची प्रमुख उपस्थिती होती. या भव्य समारंभासाठी आणि महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या रसिकांमध्ये कलाप्रेमींशिवाय स्थानिक नागरिकही उपस्थित होते. भारत आणि कोरिया या दोन देशांतील कला संस्कृती आणि कलावंतांच्या विचारांचे आदानप्रदान करणे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. जगभरातील जवळपास २00 हून अधिक कलावंतांच्या कलाकृती या प्रदर्शनात आहेत.
परदेशात भारतीय कलेला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंदाने छाती भरून आली. दोन्ही देशांतील कलाकारांच्या कलाकृती आणि वेगवेगळ्या शैलीतील काम पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळाली, याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.
संजीव संकपाळ
चित्रकार, कोल्हापूर.