कोल्हापुरातील गणरायाच्या गीताला जगभरातून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:52 PM2017-08-25T23:52:30+5:302017-08-25T23:54:39+5:30
कोल्हापूर : चिन्मय कोल्हटकर या कोल्हापूरच्या युवा कलाकाराने संगीत दिलेल्या गणेश गीताला केवळ बारा तासांत जगभरातील १००० ‘व्हिवर्स’नीं दाद दिली असून २०० जणांनी हे गीत ‘शेअर’केले आहे.
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चिन्मय कोल्हटकर या कोल्हापूरच्या युवा कलाकाराने संगीत दिलेल्या गणेश गीताला केवळ बारा तासांत जगभरातील १००० ‘व्हिवर्स’नीं दाद दिली असून २०० जणांनी हे गीत ‘शेअर’केले आहे. प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी या गीताचे गायन केले असून शर्वरी जमेनीस यांनी यामध्ये कथ्थक सादरीकरण केले आहे. पाच मिनिटांच्या या गाण्यामध्ये या दोघांनी कथ्थक बंदिशी सादर केल्या आहेत.
प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक यांनी ‘यू ट्यूब’वर ‘धाता’ हे चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवरील पहिल्या व्हिडिओसाठी ‘शेंदूर लाल चढायो’ हे गीत तयार करण्यात आले. कोल्हापूरचे चिन्मय कोल्हटकर यांनी या गीताला संगीत दिले असून आमोद कुलकर्णी यांनी संयोजन केले आहे. संदीप कुलकर्णी यांची बासरी असून निखिल फाटक यांची तबला साथ आहे. पंधरा दिवसांमध्ये या गीताचे ध्वनिमुद्रण करण्यात आले.
गणेशाची स्तुती करणाºया या गीतामुळे प्रसन्न वातावरण अनुभवण्यास मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक रसिकांनी व्यक्त केल्या आहेत. गायक महेश काळे यांनी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी हे गाणे यू ट्यूब, व्हॉटस् अॅप आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून अपलोड केले आणि जगभरातून या गीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ख्यातनाम तबलावादक पद्मश्री विजय घाटे, अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर, संवादिनी वादक आदित्य ओक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
महेश काळे यांचा भारदस्त आवाज, उत्तम कोरस आणि शर्वरी जमेनीस यांचे कथ्थक याचा अफलातून संयोग या गीतामध्ये झाला असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रसिकांचा हा उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे.चिन्मय कोल्हटकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या आजोबांची गुजरी कॉर्नरला ‘भोजन क्लब कोल्हटकर’अशी खानावळ होती. चिन्मयचे वडील प्रा. सुहास कोल्हटकर हे कोल्हापूर जिल्'ातील आजरा महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते ही संगीतप्रेमी आहेत.
चिन्मयचे बारावीपर्यंतचे शिक्षण आजरा महाविद्यालयात तर तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले; परंतु त्यानंतर गेली १७ वर्षे तो संगीतक्षेत्रात रमला आहे.डॉ. अरविंद थत्ते यांचा शिष्य असलेल्या चिन्मयने पं. सुरेश तळवलकर, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, पं. बिरजू महाराज, पं. झाकीर हुसेन या दिग्गजांना संवादिनी साथ केली आहे.