‘रानभाज्या वनौषधी लागवड’ कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 01:25 AM2017-05-16T01:25:59+5:302017-05-16T01:25:59+5:30
‘निसर्गमित्र’चे आयोजन : सौरऊर्जेसंदर्भात प्रात्यक्षिक; घरी साधने बनविण्याबाबत मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील निसर्गमित्र संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या रानभाज्या वनौषधी लागवड आणि संवर्धन कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. साईक्स एक्स्टेन्शन येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय परिसरात ही कार्यशाळा पार पडली.
पांढरा कुडा या रानभाजीच्या कुंडीला वृद्ध निसर्गप्रेमींच्या हस्ते पाणी घालून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले. यावेळी त्यांनी ‘कचरा आणि सांडपाण्याचा पुनर्वापर’ या संदर्भात प्रात्यक्षिके दाखविली. यात खतनिर्मिती करणाऱ्या कचऱ्याच्या बास्केटसह विविध प्रकारच्या उपाययोजनांची माहिती होती. पर्यावरणपूरक जीवनशैलीत आवश्यक मातीच्या उपकरणांची ओळख व उपयोग याविषयी अनुराधा नलवडे यांनी मार्गदर्शन केले. पराग केमकर यांनी सौरऊर्जेचे महत्त्व आणि उपयोग यांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी सौरदिवा, सौरकुकर अशी साधने घरच्या घरी कशी बनविता येतात, याचे प्रात्यक्षिकही दाखविले.
‘वनौषधी रानभाज्यांची ओळख, पाककृती, विविध व्याधींसाठी त्यांचा उपयोग’ या विषयावर वैद्य अशोक वाली यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून माहिती दिली. राणिता चौगुले यांनी कागदी आणि कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी वनस्पतींची ओळख, बीजारोपण, रोपे तयार करण्यासाठी पिशव्या तयार करणे व रोपांची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी पाणी व त्याच्या वापराबाबत माहिती दिली. पाण्याची दैनंदिन बचत करण्याबाबत उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. यावेळी वनस्पतीजन्य रंगांचे महत्त्व, रंगांची शेती, रंगनिर्मिती, खाद्यरंग निर्मितीविषयी अनिल चौगुले यांनी स्लाईड शोद्वारे माहिती दिली.
कार्यशाळेचा समारोप सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक उपसंचालक नरेंद्र राजाज्ञा यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी वृक्षलागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. वनौषधीच्या बियांचे संकलन करून त्याच्या वाढदिवसानिमित्त संस्थेस भेट दिल्याबद्दल बालनिसर्गप्रेमी यश पवार यांचा राजाज्ञा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यशाळेचे संयोजन सुरेखा दोशी, अभय कोटणीस, दिनकर चौगुले, शालिनी वोरा, भारत चौगुले, यश चौगुले यांनी केले.
फोटो : १५0५२0१७ कोल निसर्गमित्र 0१
फोटोओळ : निसर्गमित्र संस्थेतर्फे कोल्हापुरात ‘रानभाज्या वनौषधी लागवड आणि संवर्धन’ कार्यशाळेत राणिता चौगुले यांनी प्रात्यक्षिक दाखविले.
१५0५२0१७ कोल निसर्गमित्र 0२
फोटोओळ :