जगन्नाथ दिक्षित यांच्या उपस्थितीत रंकाळा प्रदक्षिणेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:39 PM2019-11-02T16:39:12+5:302019-11-02T16:41:45+5:30
रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणारे डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनीही सर्वाबरोबर या मोहीमेत सहभागी होत रंकाळा तलावास फेरफटका मारला.
कोल्हापूर : रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणारे डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनीही सर्वाबरोबर या मोहीमेत सहभागी होत रंकाळा तलावास फेरफटका मारला.
रंकाळा चौपाटी परिसरात सकाळी ७ वाजता या प्रदक्षिणेस सुरुवात झाली. यात रंकाळा संवर्धनासाठी झटणारे शेकडो स्त्री-पुरूष नागरीक सहभागी झाले होते. रंकाळा चौपाटी- तांबट कमान-जुना वाशीनाका, इराणी खण, क्रशर चौक, पतौडी खण, रंकाळा पदपथ उद्यान असे ४.४० कि.मी.चे अंतर पार करीत ही मोहीम पदपथ येथे समाप्त करण्यात आली.
उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन डॉ. दिक्षित यांनी केले. यावेळी त्यांनी नियमित चाला, दिवसातून दोन वेळा भुक लागल्यानंतर खा, गोड पदार्थ शक्यतो टाळा असा संदेश दिला. यावेळी सुधर्म वाझे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कमी खा, जास्त जगा
डॉ. दिक्षित यांनी नियमित जेवताना जेवढे अन्न घेतो तेवढेच दुसऱ्या दिवशी खा, जो कमी प्रमाणात खाईल तो जास्त काळ जगेल. दोन जेवणांच्या मधल्या अंतरात ताक, २५ टक्के दुधाचा चहाही घेतला तरी चालतो. ४५ मिनिटात किमान पाच किलोमीटर चाला. ५५ मिनिटात जेवा, कडधान्ये, फळे खा असा संदेश दिला.
एक वेळ खाणारा योगी
प्राणी जर आजारी असेल तर तो तंदुरुस्त होईपर्यंत खात नाही. मात्र, मनुष्य आजारी असला तरी औषध घेवून दोन वेळा जेवतो. त्यात एक वेळ जेवणारा साधुसंतासारखा योगी, दोन वेळा खाणारा भोगी, तर तीन वेळ खाणारा रोगी , अशी मिश्किलीही त्यांनी उपस्थितांमध्ये केली.