हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद, शाळा, दुकाने, बंद; रस्त्यावर मात्र वर्दळ
By पोपट केशव पवार | Published: August 23, 2024 11:50 AM2024-08-23T11:50:47+5:302024-08-23T11:51:46+5:30
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
कोल्हापूर : बांगलादेशातील हिंदुवर होणारा अन्याय आणि रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला सकाळच्या टप्प्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली असून शाळा, कॉलेज, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.
शहरातील भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, पापाची तिकटी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर उतरले असून हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी केल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले.
शहरातील सर्वच दुकाने बंद असली तरी रस्त्यावरची वर्दळ हटलेली नाही. मंदिर, प्रार्थनास्थळ याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून शहरातील प्रमुख चौकातही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. केएमटीसह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्याने कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.