मानवी अधिकार, लिंगभाव विषयावरील कार्यशाळेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:47+5:302021-05-30T04:19:47+5:30
कोल्हापूर : इक्वल कम्युनिटी फाऊंडेशन, पुणे आणि सायबर महाविद्यालयातर्फे ‘मानवी अधिकार व लिंगभाव’ या विषयावर २६ ते २९ मे ...
कोल्हापूर : इक्वल कम्युनिटी फाऊंडेशन, पुणे आणि सायबर महाविद्यालयातर्फे ‘मानवी अधिकार व लिंगभाव’ या विषयावर २६ ते २९ मे या कालावधीत चार दिवसीय झालेल्या ऑनलाईन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इक्वल कम्युनिटी फाऊंडेशन, पुणे या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमार्फत सायबर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘मानवी अधिकार व लिंगभाव’ या विषयावर ही चार दिवसीय कृतीशील कार्यशाळा पार पडली. यावेळी विषयतज्ज्ञ म्हणून योगेश हुपरीकर यांनी लिंगभेदाविषयीचा दृष्टिकोन, राहुल कुसुरकर यांनी लिंगभेदाविषयी तरुणांची असणारी सकारात्मक भूमिका व त्याचे महत्त्व याविषयी तर अंजना गोस्वामी यांनी भविष्यकाळातील कृतीशील उपक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या चार दिवशीय ऑनलाईन कार्यशाळेत सुमारे ४०हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी ही कार्यशाळा त्यांच्या विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देणारी असल्याचे नमूद केले. या कार्यशाळेचे आयोजन सायबर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी केले होते. संचालक डॉ. चंद्रकांत दळवी व ‘नॅक’चे समन्वयक डॉ. टी. व्ही. जी. सरमा यांनी मार्गदर्शन केले. सायबरचे व्यवस्थापकीय सचिव डॉ. आर. ए. शिंदे आणि विश्वस्त ऋषिकेश शिंदे यांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले.
(बातमीदार : संदीप आडनाईक)