आधारकार्डची जबाबदारी आता शाळांवर...

By admin | Published: April 22, 2015 10:56 PM2015-04-22T22:56:35+5:302015-04-23T00:35:18+5:30

अभियान राबवणार : शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने व्यवस्था करावी

The responsibility of the Aadhar card is now on schools. | आधारकार्डची जबाबदारी आता शाळांवर...

आधारकार्डची जबाबदारी आता शाळांवर...

Next

शृंगारतळी : शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७ एप्रिल ते २६ जून या कालावधीत अभियान राबवित आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी शासनाने आता शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकली आहे. यासाठी २७ एप्रिल ते २६ जून या तारखेपर्यंत आधारकार्ड अभियान राबविण्यात येणार असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
राज्यातील शाळामध्ये प्रवेशित प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढून ते प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात यावे असा आदेश शिक्षण विभागाने परिपत्रकाने काढला आहे. त्यामुळे आता शिक्षक, पालक व अधिकारी या सर्वांनाच शासनाचे आधारकार्डाच्या कामाला जुंपले आहे. शाळांनी प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकाचे आधारकार्ड तयार करण्यासाठी दि. २७ एप्रिल ते २६ जून हा कालावधी निश्चित केला आहे. प्रवेशित प्रत्येक बालकाच्या प्रवेश नोंदणी पंजिकेतील क्रमांक आता आधारकार्डाशी जोडण्यात यावा. त्यामुळे भविष्यातील एकही बालक शाळाबाह्य होणार नाही व झालेच तर कुठे व कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होईल.
जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांनी आधारकार्ड निमिर्तीसाठी जी यंत्रे उपलब्ध आहेत, त्याचा पर्याप्त उपयोग करून या ६० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील आधारकार्ड तयार करण्यात न आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे तालुका, गावनिहाय नियोजन करण्यात आदेश देण्यात आले आहेत. उपलब्ध संसाधनचा पर्याप्त वापर करून २६ जूनपर्यंत १०० टक्के बालकांचे आधारकार्ड तयार करून ते प्रवेशाशी संलग्न करावेत. कोणत्या गावात किती बालकाचे आधारकार्ड तयार केलेले नाहीत, याबाबतची माहिती शाळांकडून गटशिक्षणाधिकारी यांनी संकलित करून शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करावी. २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या गटातील ज्या शाळातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध करून देणे आहे.
दि. ३ मे ते ४ मे रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती एकत्रित करून शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी आधारकार्ड न काढलेल्या बालकांची गावनिहाय यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावयाची आहे. ५ मे जिल्हाधिकारी कक्षातील संबंधित अधिकाऱ्याशी गटशिक्षणाधिकारी यांच्यासह गावनिहाय नियोजनासाठी संसाधनानुसार तालुक्यातील कोणत्या शाळेतील किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड कोणत्या दिनांकास तयार करावयाचे ते बैठक घेऊन नियोजन करावयाचे आहे. ६ मे रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी, केंदप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्याशी केलेल्या नियोजनाबरहुकूम कार्याची दिशा निश्चित करणे आहे. ७ मे रोजी मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी आधारकार्डासाठी जनजागरण व नियोजन करावयाचे आहे. ८ मे रोजी गावातून प्रभात फेरी काढून आधारकार्डबाबत प्रचार व प्रसार करायचा असल्याचा आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)


नवे वेळापत्रक संभाळा
विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची जबाबदारी आता शिक्षकांवर येऊन पडल्याने शिक्षकांना मे महिन्यातच काम लागले आहे. या आधारकार्ड अभियानाचा कार्यक्रमच शासनाने जाहीर केला असून त्यामुळे परीक्षेनंतर नवे वेळापत्रक शिक्षकांना सांभाळावे लागणार आहे.

Web Title: The responsibility of the Aadhar card is now on schools.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.